For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेख हसीना यावर्षीच बांगलादेशात परतणार

06:39 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेख हसीना यावर्षीच  बांगलादेशात परतणार
Advertisement

ईमेल मुलाखतीद्वारे दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या देशात परतण्याची घोषणा केली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या ईमेल मुलाखतीत शेख हसीना यांनी बांगलादेशात परतण्याबद्दल प्रथमच स्पष्ट भाष्य केले आहे. ‘मी यावर्षी माझ्या देशात परत जाईन,’ असे त्या म्हणाल्या. बांगलादेशात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या देशात त्यांच्यावर अनेक खटले प्रलंबित आहेत.

Advertisement

ईमेल मुलाखतीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संपर्क साधताना शेख हसीना यांनी विविध मुद्यांवर आपली मते मांडली. आपल्या विरोधातील निकाल हा न्यायाने नव्हे, तर राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होता, असा आरोप त्यांनी केला आहे. अवामी लीगला नेतृत्वहीन करण्यासाठी न्यायव्यवस्थेचा वापर केला जात आहे. मला मृत्यूची भीती नाही. 1975 मध्ये मी माझे आई-वडील, भाऊ आणि माझे जवळजवळ संपूर्ण कुटुंब गमावले. माझ्यावर ग्रेनेडने हल्लाही झाला होता, पण मी प्रत्येक कटावर मात करून लोकांच्या पाठीशी उभी राहिले. यावर्षी, मी प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक कट मोडून माझ्या देशात परत जाईन, असे त्यांनी स्पष्ट पेले.

अवामी लीग ही लोकांची शक्ती

अवामी लीग हा 77 वर्षांपासून बंगालची माती, इतिहास आणि लोकांशी जोडलेला पक्ष आहे. त्यावर अनेकवेळा बंदी घालण्यात आली, त्याच्या नेत्यांच्या हत्या झाल्या आणि त्याला दडपशाहीचा सामना करावा लागला, पण प्रत्येकवेळी हा पक्ष पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन उदयास आला आहे. अवामी लीगचे पुनरागमन हे इतर कोणत्याही पक्षाच्या कमकुवतपणावर अवलंबून नाही, तर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. लोकांच्या हृदयातून अवामी लीगला कोणीही पुसून टाकू शकत नाही, असेही शेख हसीना यांनी म्हटले आहे.

विद्यमान सरकारवर हल्लाबोल

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार आणि आता बीएनपी सरकारच्या काळात लोकशाही, कायद्याचे राज्य आणि सार्वजनिक सुरक्षा संपली आहे, असे म्हणत शेख हसीना यांनी सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर हल्ला चढवला. सध्या बांगलादेशची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे, दहशतवाद वाढत आहे आणि अवामी लीगचे नेते व कार्यकर्त्यांवर अभूतपूर्व अत्याचार होत आहेत. दोन्ही सरकारांचे वास्तव आता जनतेला समजले आहे, असा दावा त्यांनी केला.

Advertisement
Tags :

.