शेख हसीना सर्वोच्च नेत्या म्हणूनच परततील !
बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांचा दावा
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात उठाव झाल्यामुळे भारतात जावे लागलेल्या बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना पुन्हा या देशाच्या सर्वोच्च नेत्या म्हणूनच देशात परततील, असा विश्वास बांगलादेशातील अवामी लीगच्या नेत्यांनी प्रकट गेला आहे. देशातील विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केले. त्यामुळे त्यांना देश सोडावा लागला. तथापि, आता या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या नेत्यांना त्यांची चूक कळून आली आहे. देशातील वातावरण शेख हसीना यांना अनुकूल होत असून त्या नेत्या म्हणूनच बांगलादेशात परततील, असे प्रतिपादन या नेत्यांनी केले आहे. शेख हसीना यांना सुरक्षित स्थान देण्यासाठी त्यांनी भारताचे आभारही मानले.
विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलन केले. तथापि, ती त्यांची चूक नव्हती. त्यांना काही देशविरोधी शक्तींनी भडकाविले होते. त्यांच्या दुष्प्रभावाखाली येऊन विद्यार्थी संघटनांनी हे आंदोलन प्राणपणाने केले. तथापि, आता त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आपला उपयोग करुन घेण्यात आला आहे, हे त्यांना उमगले आहे. बांगलादेशची स्थिती अत्यंत नाजूक असून आंतरराष्ट्रीय समुदायाने आमच्याकडे गांभीर्याने आणि सहानुभूतीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देशात उठाव झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या मोहम्मद युनूस यांनी आता पदत्याग करावा. ते जेथून आले, तेथे त्यांनी परत जावे. लवकरच शेख हसीना सन्मानाने भारतातून बांगला देशात परत येतील, अशी आम्हाला शाश्वती आहे, असे वक्तव्य या नेत्यांनी केले आहे.