प्रसारमाध्यमांना सामोऱ्या जाणार शेख हसीना
दोन वर्षांनी पहिल्यांदाच घडणार : 5 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणार कार्यक्रम
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
बांगलादेशात दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तापालटापासून भारतात वास्तव्य करणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच प्रसारमाध्यमांना सामोऱ्या जाणार आहेत. भारतात आल्यापासून त्या पहिल्यांदाच व्हर्च्युअली प्रसारमाध्यमांना संबोधित करतील. त्यावेळी शेख हसीना बांगलादेशात वापसी करण्याच्या रणनीतिवरही मत व्यक्त करू शकतात. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत बांगलादेशात परतणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
शेख हसीना यांचा हा कार्यक्रम दिल्लीत फॉरेन कॉरेस्पोडेंट्स क्लब ऑफ साउथ एशियाकडून आयोजित केला जाणार आहे. 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात शेख हसीना मोठ्या घोषणा करू शकतात. हे संभाषण संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7.30 वाजेपर्यंत चालणार आहे. या संभाषणाचे अनेक प्लॅटफॉर्म्सवर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील होणार आहे.
शेख हसीना यांनी चालू वर्षाच्या अखेरपर्यंत मायदेशी परतण्याचे संकेत दिले असताना केंद्र सरकारने एका संसदीय समितीला ऑगस्ठ 2024 पासून देशात हसीना यांना भारतीय क्षेत्रातून राजकीय घडामोडी घडविण्यासाठी कुठलेच व्यासपीठ देण्यात आले नसल्याचे कळविले आहे.
हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची विनंती सध्या विचाराधीन असल्याचे संसदीय समितीने स्वत:च्या अहवालात नमूद केले आहे. संसदेच्या विदेश विषयक समितीचे अध्यक्ष काँग्रेस खासदार शशी थरूर आहेत. प्रत्यार्पण विनंतीची पडताडळणी भारत सरकारच्या सक्षम अधिकाऱ्यांकडून कायदा अन् स्थापित प्रक्रियांच्या अंतर्गत केली जात आहे. भारताकडून हसीना यांना आश्रय देण्याचा निर्णय गंभीर संकट किंवा अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करणाऱ्या व्यक्तींना आश्रय देण्याची संस्कृती आणि मानवी परंपरा दर्शवितो अशी टिप्पणी समितीने केली आहे. तसेच आमच्या भूमीवरून कुठल्याही अन्य देशाच्या विरोधात कुठलीच राजकीय घडामोड संचालित होणार नाही या तत्वाचे भारताने पूर्णपणे पालन केले असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.