‘काँटा लगा’फेम शेफाली जरीवाला हिचे निधन
वृत्तसंस्था/ मुंबई
‘काँटा लगा’ या रिमेक गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात झालेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी शनिवारी निधन झाले. वृत्तानुसार, 27 जूनच्या रात्री तिला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी मृत जाहीर केले. तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करत पती पराग त्यागी यांच्यासह चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. फॉरेन्सिक टीमने शेफालीच्या घराचीही तपासणी करत पुरावे गोळा केले आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टम दोनदा करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उशिराने शेफालीचे अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमीत करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री शेफालीला तिचे पती आणि अभिनेता पराग त्यागी यांच्यासह तिघांनी बेशुद्धावस्थेत मुंबईतील अंधेरी येथील बेलेह्यू रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंनी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. त्याठिकाणी तिचे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि फिटनेस ट्रेनर देखील पोहोचले होते.
शेफाली जरीवाला हिने 2004 मध्ये मीत ब्रदर्स जोडीतील संगीतकार हरमीत सिंगशी लग्न केले होते. 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने 2015 मध्ये अभिनेता पराग त्यागीशी विवाह रचला होता.