Kolhapur News : शीतल फराकटे यांची बंडखोरी; राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का
उमेदवारी डावलल्याने शीतल फराकटे अपक्ष निवडणूक लढवणार
सरवडे : कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षा शीतल रोहित फराकटे यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी डावलल्याने अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले, शीतल फराकटे यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारा आहे.
सरवडे फराकटेवाडी (ता. कागल) येथील सौ. फराकटे या गेली अनेक वर्षे मंत्री हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व मानून काम करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष पदाचे काम करीत आहेत. होऊ घातलेल्या परिषद मतदारसंघातून निवडणुकीत त्यांनी आपण बिद्री जिल्हा निवडणूक रिंगणात उतरण्याचे घोषित केले होते. तसेच पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने नाराजी व्यक्त करीत बंड केले आहे. बोरबडे जिल्हा परिषद गटातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय व्यक्त केला असून उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत.
आम्ही काय फक्त पक्षाची कामंच करायची का?
याबाबत अधिक माहिती देताना शीतल फराकटे म्हणाल्या, गेली अनेक वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करते. महिला जिल्हा अध्यक्ष पदाच्या माध्यमातून माझी जबाबदारी पार पाडत आले आहे. मात्र पक्षाने माझी उमेदवारी डावलून माझ्यावर अन्याय केला आहे. माझ्या कुटुंबाने देखील चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. दीड वर्षांपूर्वी आमचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु तो पाळलेला नाही. आम्हाला उमेदवारी मिळत नाही तर मग आम्ही फक्त पक्षाची कामे करायची व सभा गाजवायच्या का? पक्षाने अन्याय केला तरी सामान्य माणसांच्या पाठबळावर अपक्ष लढणार असून पक्ष पदाचा देखील राजीनामा देणार आहे.