बच्चे सावर्डेत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार : दोन बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद
वारणानगर प्रतिनिधी
बच्चे सावर्डे ता.पन्हाळा येथील खडी भागातील जयवंत रामचंद्र पाटील यांच्या सातबिगे शेतात बिबट्याने केलेल्या हल्यात एक मेंढी ठार झाली असून वन विभागाने तातडीने लावलेल्या कॅमेर्यात दोन बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले.कोगनोळी,कर्नाटक येथील मेंढपाळ रावसाहेब कोळेकर हे आपल्या मेंढ्या चरवण्यासाठी बच्चे सावर्डेंत आले होते यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका मेंढी वर हल्ला करून ठार केले यावेळी मेंढपाळच्या पाळीव कुत्र्यांनी मोठ्याने भुंकण्यास सुरवात केली यावेळी मेंढपाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड करण्यास सुरवात केली त्याचवेळी बिबट्याने आपल्या जबड्यातील मेंढी सोडून देऊन पळ काढला.
या घटनेची माहिती पोलीस पाटील सागर यादव यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व याची माहिती वन विभाग पन्हाळा यांना दिली.यावेळी तात्काळ वनअधिकारी अनिल मोहिते,वनपाल सागर पटकारे,वनरक्षक संदीप पाटील यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला.तसेच बिबट्याच्या शोधासाठी कोल्हापूर रेस्क्यू टीम यांना पाचारण केले.
रेस्क्यु टीमचे प्रदीप सुतार व वन विभाग पन्हाळा पोलीस पाटील सागर यादव यांनी ड्रोन कॅमेरा द्वारे बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.तसेच बिबट्याचा शोध घेण्यासाठी बिबट्याने ठार केलेली मेंढी त्याच ठिकाणी ठेऊन सदर ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले.यामध्ये २ बिबट्या दिसून आले.यामध्ये बिबट्यांनी त्या मेंढीस ऊसाच्या शेतात घेऊन गेले.बच्चे सावर्डे गावात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे नागरिकांनी शेतात जाताना एकटे जाऊ नये,सोबत बॅटरी काठी बाळगावी,मोबाईल चालू ठेवावा,बोलत जावे तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी असे आव्हाहन वनविभागाने केले आहे.