माझी बहीण आहे..तिच्याकडे गोरखपूरपर्यंत लक्ष द्या !
कोल्हापूर / धीरज बरगे :
कोल्हापुरी बोलीभाषेच्या डिक्शनरीमधील ‘भावा’ला साजेशी कामगिरी केलीय मंगळवार पेठेतील शुभम कारंडे, हर्ष लोहार यांनी. त्यांनी कौटुंबिक विवंचना अन् आर्थिक समस्येत सापडलेल्या एका प्ररप्रांतीय विवाहितेला गोरखपूरला जाण्यासाठी मोलाची मदत केली. पुणे ते मुंबई प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीतून संबंधित विवाहितेला मदतीची गरज असल्याची जाणीव त्यांना झाली. महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना या अनोळखी बहिणीला मदतीचा हात देत शुभम, हर्षने कोल्हापूरच्या माणुसकीचे दर्शन घडवले. संबंधित विवाहितेला तिच्या माहेरी जाणाऱ्या गोरखपूरच्या रेल्वेत बसवून त्यांनी महिला सुरक्षेचा आदर्श घालून दिला आहे.
शुभम आणि हर्ष कोल्हापूरमधून त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. पुण्यामध्ये मित्रांना भेटून ते रेल्वेने मुंबईला निघाले होते. पुणे स्टेशनवर त्यांना ही परप्रांतीय विवाहिता दिसली. तिच्यासोबत दीड ते दोन वर्षांचा चिमुकला होता. मुलगा गोड असल्याने शुभमने त्याला खिशामधील चॉकलेट दिले. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेमध्ये शुभम, हर्ष बसले. योगायोगाने ती विवाहिताही त्यांच्यासमोरच बसली. तिच्या हालचालीवरुन ती टेन्शनमध्ये असल्याचे शुभमला जाणवले. शुभमने बोलत-बोलत त्या विवाहितेला बोलते केले. यावेळी ती कौटुंबिक वादातून घराबाहेर पडल्याचे समजले. तिच्याकडे मोबाईलही नव्हता आणि जवळ होते केवळ दहा रुपये. त्यातच ती गर्भवती असल्याचेही निदर्शनास आले. दोन दिवसांपासून तिने काही खाल्लेही नव्हते. त्यामुळे शुभमने या मायलेकाला प्रथम पोटभर खायला दिले. त्यानंतर कौटुंबिक छळाला कंटाळून गोरखपूरला माहेरी जाणार असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे शुभम, हर्ष यांनी तिला सुखरुप गोरखपूरला पोहोचवण्याचे ठरवले. यावेळी याच रेल्वेमधून मुंबईचा एक तरुणही प्रवास करत होता. त्यानेही शुभम, हर्षला यामध्ये मदत केली.
पुण्याहून रेल्वेने हे सर्वजण मुंबईला आले. साधारणत: सव्वाचारच्या सुमारास मुंबईमधील कुर्ला रेल्वेस्थानकावरुन गोरखपूरला रेल्वे होती. पण हे सर्वजण कुर्ला रेल्वेस्थानकावर पोहोचले, तोच गोरखपूरची रेल्वे मार्गस्थ झाली. विवाहितेला चिमुकल्यासोबत धावत रेल्वेत बसणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांची गोरखपूरची रेल्वे चुकली. यावेळी त्यांच्यासोबतच्या तरुणाने त्यांना बांद्रा रेल्वेस्थानकावरुन गोरखपूरला रेल्वे असल्याचे सांगितले. तसेच कुर्ला ते बांद्रा प्रवासाची माहिती देऊन तरुण निघून गेला.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शुभम, हर्ष हे मायलेकरू बांद्रा स्थानकावर पोहोचले. मात्र गोरखपूरला जाणारी रेल्वे रात्री दहा वाजता होती. मायलेकराला इतका वेळ एकटे न सोडता शुभम, हर्ष रात्री दहा वाजेपर्यंत तिच्यासोबत थांबले. तिचे रेल्वेचे गोरखपूरचे तिकीट काढले. तिला खर्चासाठी पैसेही दिले. रेल्वेमध्येही बसताना त्यांना गोरखपूरलाच जाणाऱ्या एका महिलेशेजारी बसवले. त्या महिलेला ही माझी बहीण आहे. ती गोरखपूरला पोहोचेपर्यंत तिच्याकडे लक्ष द्या, असे सांगून शुभम, हर्ष माघारी फिरले.
- गोरखपूरची रेल्वे सुटली अन् ...
आठ ते नऊ तासांच्या प्रवासात विवाहितेचा चिमुकला शिवांश शुभम, हर्षसोबतच जास्त काळ होता. या प्रवासादरम्यान शिवमसोबत त्यांनी खूप दंगामस्ती केली. त्यामुळे शिवमलाही त्यांचा लळा लागला. मायलेकराला रेल्वेत बसवले, रेल्वे सुटली तेंव्हा खिडकीमधून चिमुकल्याला बाय-बाय करताना त्याने फोडलेला टाहो पाहून शुभम व हर्षचे डोळे पाणावले.