‘एलआयसी’चे शतमन्यू श्रीवास्तव नवे सीएफओ
सुनील अग्रवाल यांच्या जागी होणार नियुक्ती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीने नव्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) यांची नियुक्ती केली आहे. शतमन्यू श्रीवास्तव आता एलआयसीचे नवे सीएफओ बनले आहेत. त्यांनी आतापर्यंत एलआयसीमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले असून त्यांना तीन दशकांहून अधिकचा प्रदीर्घ कामाचा अनुभव आहे.
एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, 28 जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शतमन्यू श्रीवास्तव यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय संचालक मंडळाच्या नामनिर्देशन आणि मानधन समितीच्या शिफारशीच्या आधारावर घेण्यात आला आहे.
कधी झाले दाखल
शतमन्यू श्रीवास्तव यांनी 1990 मध्ये एलआयसीमध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (एएओ) म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी शाखा कार्यालय, मंडळ कार्यालय, विभागीय कार्यालय आणि केंद्रीय कार्यालय यासह संस्थेच्या जवळपास प्रत्येक स्तरावर काम केले. प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांना कंपनीच्या कामकाजाची आणि आर्थिक प्रणालीची चांगली जाण आहे.
एलआयसीच्या माहितीनुसार, श्रीवास्तव 2022 पासून केंद्रीय कार्यालयात प्रमुख म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी कंपनीच्या आयपीओनंतरच्या पहिल्या आर्थिक समाप्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सेबीच्या लोडर नियमांचे पालन आणि आयआरडीएआयच्या नियामक तरतुदींशी संबंधित कामही हाताळले.
शतमन्यू श्रीवास्तव यांनी सुनील अग्रवाल यांची जागा सीएफओ म्हणून घेतली आहे. सुनील अग्रवाल यांनी जूनमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.