Gokul Election : गोकुळमध्ये राज्याच्या नेतृत्वाची 'एंट्री', शशिकांत पाटील-चुयेकरांची संधी हुकली!
गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात 'आर्थिक धवल क्रांती' आणली
By : जालंदर पाटील
चुये : कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणजे गोकुळ दूध संघ, संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची स्थापना केली. या दूध संघाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात 'आर्थिक धवल क्रांती' करण्यात मोलाची भूमिका पार पाडली.
यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदराव पाटील-चुयेकर म्हणजे गोकुळ असे जणू समीकरणच बनले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या रुपाने चुये गावाला तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा एकदा 'गोकुळ' अध्यक्षपदाचा मान मिळणार होता. मात्र गोकुळच्या राजकारणात राज्याच्या नेतृत्वाची 'एंट्री' झाली आणि ही संधी हुकली.
या निर्णयाने चुयेकर प्रेमींच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरुन गेली पंधरा दिवस सत्ताधारी गटातच नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सत्ताधारी गटाच्या नेत्यांनी सर्व समावेशक चेहरा म्हणून विद्यमान संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आणले. गोकुळच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड होणार हे पंधरा दिवसांपूर्वीच जवळजवळ निश्चित झाले.
यामुळे चुयेकर प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र एका रात्रीत नाव बदलले आणि चुयेकरांची संधी हुकली. यानंतर चुयेकर प्रेमींचा दुसरा दिवसही नाराजीच्या चर्चेत गेला. एकूणच ही हुलकावणी त्यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून आले. संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करवीर तालुका मिल्क फेडरेशनची स्थापना केली.
यानंतर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघापर्यंतचा खडतर प्रवास करत गोकुळरुपी रोपाचे वटवृक्षात गोकुळ दूध प्रकल्प उद्घाटन शुभहस्ते मा.डॉ. व्ही. कुरियन विस्तारित गोकुळ दुध प्रकल्प उद्घाटन कुरियन यांच आनंदराव पाटील - चुयेकर व संचालक मंडळ उपसि रूपांतर केले. त्यांनी १९६३ पासून ते २००२ पर्यंत गोकुळच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर ते २०१४ पर्यंत संचालक होते.
त्यामुळे तब्बल २५ वर्षानंतर चुये गावाला शशिकांत पाटील यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा मुकुट मिळणार होता. यामुळे सर्व ग्रामस्थांनी गटतट बाजुला ठेवत नियोजनाची बैठकही घेतली. त्यामध्ये नूतन अध्यक्षांचा गावच्या भूमिपुत्राचा यथोचित सन्मान करण्यासाठी आणि ऐतिहासिक मिरवणूक काढण्याचे ठरले. त्यप्रमाणे गावातील मुख्य रस्ता देखील दुरुस्त केला. अध्यक्ष निवडीदिवशी परिसरातील १२९ दूध संस्थांना अध्यक्ष निवडीसाठी निमंत्रण दिले.
चारचाकी, दुचाकी वाहतूक व्यवस्था त्यांची स्टिकर्स छापली. मिरवणूक सोहळ्याला लागणारा गुलाल, फटाके आणि पुष्पवृष्टी करण्यासाठी दोन जेसीबी देखील नियोजित केले. कोल्हापूर-गारगोटी मार्गावर निगवे खालसापर्यंत प्रत्येक गावच्या वेशीवर डिजिटल फलक उभारायचे नियोजन ठरले. मिरवणूक सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांना भोजनाचीही व्यवस्था केली होती. चुयेकर यांच्या दारात स्वागत मंडप उभारला होता, अशी सर्व जय्यत तयारी अध्यक्ष निवडीपूर्वीच झाली होती.
अध्यश्न निवडीच्या आदल्या रात्रीपासूनच राजकीय घडामोडीला कमालीचा वेग आला. गोकुळ परिसरात निवडीच्या निमित्ताने राज्य नेतृत्वाचा बेट स्पर्श झाला. त्यांच्या सुचना वजा आदेशाप्रमाणे शाहू आघाडीतील प्रमुख नेते मंडळींची बैठक जिल्ला बँकेत पार पडली. गेले पंधरा दिवस ज्यांचे नाव जिल्ह्याबरोबर राज्यात पोहोचले होते, त्या शशिकांत पाटील चुयेकर यांचा पत्ता कापला गेला. यामुळे गेली पंधरा दिवस आघाडीवर असणार नावे क्षणात मागे पडले.
३० मे रोजी सकाळी चुयेकरांचे नाव मागे पडल्याचे समजले आणि ग्रामस्थावर दुःखाचा डोंगर कोसळला. पंधरा दिवसाच्या नियोजनावर त्या निर्णयाने पाणीच फिरवले. निर्णय समजताच संस्थापकांच्या गावात अनेकांच्या डोळ्यांच्या कठा पाणवल्याचे दिसून आला. इतका हा निर्णय सर्वांच्या जिव्हारी लागला.
ज्या संस्थापकाने आपलं उभ आयुष्य या संघाच्या उभारणीसाठी समर्पित केले अशाच कुटुंबाचा कुरघोडीच्या राजकारणातून अपमानच केला.
खरतर राजकारणात विरोध हा घटक असावा मात्र कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या व्यक्तीमत्वाला व्हावा याला सीमा असते मात्र अध्यक्ष निवडीत स्व.चुयेकर यांच्या योगदानाचा विसरच पडला अन अनपेक्षीतच सारं घडलं. गोकुळच्या परिवारात चंद्र सुर्य असेपर्यंत चुयेकराच्या योगदानाचा इतिहास पुसला जाणार नाही. सत्ता कोणाचीही असो मात्र स्व. चुयेकरांचा समर्पित त्याग जिल्ह्यातील लाखो दूधउत्पादक कधीच विसणार नाहीत. अशा प्रतिक्रिया अध्यक्ष निवडीनंतर अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
राज्यातील नेत्यांचा आदेश गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना
जिल्ह्यातील सर्वच नेत्यांच्या भाषणात गोकुळ संस्थापकांचा आवर्जून उल्लेख असायचा. चुयेकर परिवारांचा सन्मान व्हायचा. मात्र पक्षीय राजकारणात विरोधालाच विरोध या भूमिकेतून संस्थापकांचे योगदान दूर गेले आणि संस्थापकांच्या कुटुंबात येणारा अध्यक्षपदाचा मान कुरघोडीच्या राजकारणातून दूरच गेला. त्यामुळे चुयेकर परिवारावर प्रेम करणाऱ्या लाखो दूध उत्पादकांना हा निर्णय दुःख देऊन गेला. अनेकांनी या निर्णयानंतर कडवट प्रतिक्रिया देऊन नाराजीही व्यक्त केली