For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शशी थरुर वर्तमान काय, भविष्य काय ?

06:14 AM Jun 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
शशी थरुर वर्तमान काय  भविष्य काय
Advertisement

थरूर हे पुढे चालून भाजपमध्ये प्रवेश करतील काय, त्यामुळे केरळच्या राजकारणाला कलाटणी मिळेल काय, याबाबत सध्यातरी अशी गणिते मांडणे धाडसाचे ठरेल. परंतु थरूर आणि काँग्रेस पक्षातील वाढत असलेली दरी ही या शक्यतेस अधिक पुष्टी देणारी आहे असे वाटते. या दौऱ्याच्या निमित्ताने थरूर समिती गरुडझेप घेईल काय याचे उत्तर सकारात्मक आहे. परंतु ही संधी त्यांच्या राजकीय जीवनाचे सुद्धा सोने करू शकते, एवढे मात्र खरे.

Advertisement

‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ असे संस्कृत सुभाषित असले तरी विद्वानास त्याच्या आयुष्यात पक्षात, पक्षाबाहेर, देशात आणि विदेशात, राज्यात आणि परराज्यात, स्वपक्षात आणि विपक्षात, संसदेत व संसदेबाहेर प्रखर विरोधास सामना करावा लागतो असे म्हटले जाते. शशी थरूर त्यास अपवाद आहेत. ते सध्या संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबतची स्पष्ट आणि रोखठोक भूमिका जगासमोर मांडण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व पक्षीय सात सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यांच्यासह रविशंकर प्रसाद, भाजप, संजय कुमार झा, जेडीयू, बैजयंत पांडा, भाजप, कनिमोझी, द्रमुक, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्रीकांत शिंदे, शिवसेना यांची नावे अग्रभागी आहेत. या समितीचा अमेरिका, ब्राझील, गयाना इ. देशांना दौरा आहे. भारताची भूमिका जगासमोर ठामपणे मांडण्यासाठी ही समिती प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. या समितीच्या ऐतिहासिक कार्याचे स्वरूप तीन बिंदूवर लक्ष देणारे आहे. पहिला म्हणजे पाकिस्तान हे दहशतवाद पुरस्कृत करणारे राष्ट्र आहे. त्याने गेल्या तीन दशकात सातत्याने भारतावर विविध प्रकारचे दहशतवादी हल्ले केले आणि त्यांनी दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालविली. त्या सर्वांचा अभ्यास करून भारताने ही मोहीम आखली होती. दुसरे म्हणजे भारताची भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद सोडत नाही तोपर्यंत कुठलीही चर्चा होणे शक्य नाही. पंतप्रधानांनी दहशतवाद व चर्चा एकाचवेळी होऊ शकत नाही असा सिद्धांत मांडला. तिसरे म्हणजे भारताची ही भूमिका जगातील विविध लोकशाही देशांसमोर मांडावयाची आणि भारताने केलेली कारवाई केवळ भारताच्याच नव्हे तर जागतिक लोकशाही देशांच्या हिताची कशी आहे हे थरूर यांना या देशात प्रवास करून पटवून द्यावयाचे आहे. राईट मॅन इन द राईट प्लेस, योग्य स्थळावर योग्य व्यक्ती या व्यवस्थापन सूत्रानुसार थरूर यांची झालेली ही निवड सर्वतोपरी योग्य आणि देशहिताची जपणूक करणारी आहे असे म्हटले जात आहे.

भारताचा जगाला संदेश?

Advertisement

जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात कडक कारवाईसाठी पार्श्वभूमी तयार करावी म्हणून भारत सरकारच्या वतीने 7 सर्वपक्षीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी विदेशात जाऊन भारताची भूमिका प्रभावीपणे कथन करणार आहेत. या 7 समित्या 40 बहुपक्षीय खासदारांनी युक्त आहेत. हे गट अमेरिका, इंग्लंड तसेच अरब अमिरात, आफ्रिका, जपान इत्यादी देशांना भेटी देत आहेत.

यशाचा चढता आलेख?

शशी कृष्णन चंद्रशेखरन थरूर 9 मार्च 1956 रोजी जन्मलेले भारतीय विचारवंत, लेखक आणि संसदपटू आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील संशोधन हे जगन्मान्य आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रसंघाचे सहसरचिटणीस म्हणून त्यांनी कार्य पेले आहे. त्यांचा संयुक्त राष्ट्रसंघातील प्रदीर्घ अनुभव भारताच्या प्रतिभेचे दर्शन घडवितो. शिवाय ते इंडियन प्रोफेशनल काँग्रेसचे 2006 पासून अध्यक्ष आहेत. माहिती तंत्रज्ञान, परराष्ट्र व्यवहार इ. संसदीय समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांनी विविध विद्यापीठांच्या 24 पेक्षा अधिक पदव्या संपादन केल्या आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने उद्याचे जागतिक नेते म्हणून सन्मान केला आहे. मनमोहन सिंग व नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदेवर विलक्षण छाप टाकली आहे. त्यांचे वत्तृत्व, लेखन आणि प्रतिपादन अर्थपूर्ण व वस्तुनिष्ठ असते. दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये ते पदवीधर झाले. टफ्ट्स विद्यापीठाच्या फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या संस्थेत त्यांनी 1978 साली डॉक्टरेट पदवी संपादन केली. या विद्यापीठातील ते सर्वात तरुण संशोधक होते. 1978 ते 2007 पर्यंत ते संयुक्त राष्ट्रसंघात करियर अधिकारी या पदावर कार्यरत होते. 2001 साली ते संप्रेषण आणि सार्वजनिक माहिती कार्यासाठी सहसरचिटणीस पदावर पोहोचले. 2006 साली त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस पदासाठी निवडणूक लढविली. पण त्या पदावर बान की-मून यांची निवड झाल्यानंतर त्यांनी तेथून निवृत्ती घेतली. 2009 साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2009, 14, 19 आणि 24 च्या सार्वत्रिक निवडणुकीत तिरुवनंतपुरम या मतदार संघातून चार वेळा विजय मिळविला. यूपीए काळात थरूर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काही काळ काम पाहिले. 2022 मध्ये खर्गे यांचा पराभव करून ते काँग्रेस अध्यक्ष बनले. परंतु गांधी कुटुंबाशी त्यांचे सूत जमले नाही. त्यामुळे त्यांना वरची पदे मिळू शकली नाहीत. अनेक पुरस्कार मिळविणारे नामांकित लेखक व निष्णात वत्ते असलेले थरूर हे मोदी यांच्या उदयापूर्वी तेव्हाच्या ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय होते. 2025 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात केलेल्या भाषणात इंग्लंडने वसाहतीच्याकाळात केलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी असे सूत्र मांडले होते. भारताच्या विविध क्षेत्रातील सॉफ्ट पॉवरचे महत्त्व सांगणारे ते एक विचारवंत आहेत. त्यांच्या गाजलेल्या भाषणांना 10 लाखापासून 2 दशलक्षापर्यंत ह्यूज मिळाले आहेत. इतिहास असो, लोक प्रशासन असो, भूराजनीति असो अनेक क्षेत्रात त्यांच्या प्रतिभेचा लीलया संचार होतो. संयुक्त राष्ट्रसंघाने निवडून आलेल्या प्रतिनिधीसाठी आपले दरवाजे मुक्तपणे उघडले पाहिजेत अशी त्यांची भूमिका असते. त्यांची यूनोचे सरचिटणीस होण्याची संधी हुकली. परंतु आता या महत्त्वपूर्ण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला नवी कलाटणी मिळाली आहे.

अनुभव आणि व्यासंग?

शशी थरूर हे संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे दीर्घकाळ प्रतिनिधी होते. त्यांचा संसदीय कामकाजाचा अनुभवही मोठा दांडगा आहे. शिवाय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात आणि लेखनात प्रकट होते. जागतिक राजकारणातील प्रमुख नेत्यांचा आणि त्यांच्या धोरणांचा त्यांचा सूक्ष्म व चिकित्सक अभ्यास आहे. प्रश्नाची समज, आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाणीव आणि भारताच्या ठाम भूमिकेचे त्यांना यथार्थ आकलन आहे.

क्षमतांचे संवर्धन?

थरूर यांनी राजकीय जीवनात केलेले धोरणात्मक क्षमतांचे संवर्धन अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. ते कुशल अभ्यासू, अधिकारी, संयुक्त राष्ट्रसंघातील मुत्सद्दी आणि भारतीय राजकारणातील संतुलित व्यक्तिमत्व असे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांचे कार्य निश्चितपणे निर्विवाद आणि नि:संशयपणे श्रेष्ठ दर्जाचे ठरेल याची अनेक राजकीय पंडितांना खात्री वाटते. नरेंद्र मोदी यांचे दशक व त्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांचे दशक या काळाचे ते साक्षीदार आहेत आणि त्यांनी भारताची आर्थिक प्रगती, विज्ञान तंत्रज्ञान आणि संगणकीकरण व अंतराळ संशोधनात भारताने घेतलेली झेप तसेच परराष्ट्र धोरणातील भारताचा ठाम दृष्टीकोन या साऱ्या गोष्टी त्यांनी याची देही याची डोळा स्वत: पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत.

श्रेष्ठ लोकशाही परंपरा?

स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात भारतामध्ये श्रेष्ठ लोकशाही परंपरांचा विकास झाला आहे. संस्थात्मक लोकशाहीच्या विकासात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीच्या रथाची दोन चाके असतात. उभयतांनी परस्पर सहकार्याने कार्य केल्यास देशाची प्रतिष्ठा उंचावते आणि देशापुढील जिवंत प्रश्न सहजपणे सोडविता येणे शक्य होते. हे सूत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शशी थरूर यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. 2024 पासून ते परराष्ट्र खात्याच्या संसदीय व्यवहार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांचा तो अनुभवही तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवाय आता सरकारने त्यांच्यावर या संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून दायित्व दिले आहे आणि हे दायित्व ते उत्तमप्रकारे पार पाडतील एवढे प्रमुख सद्गुण त्यांच्या अंगी आहेत. समस्यांचा अभ्यास, विश्लेषण, त्यासाठी आवश्यक आंतरदृष्टी तसेच अहवाल, दस्तऐवज, ग्रंथ, माध्यमातून येणारे सर्व ताजे विचार या सर्व गोष्टींचा त्यांचा अभ्यास सखोल आहे, परखड आहे आणि तेवढाच प्रगल्भही आहे. त्यांच्या या अभ्यासू मनोवृत्तीचे प्रतिबिंब या सर्व देशात जेव्हा हे शिष्टमंडळ पोहोचेल तेव्हा तेथे प्रकट होईल. शशी थरूर यांचे जागतिक राजकारणाचे आकलन वर्तमान काळाच्या पुढे जाणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकून सरकारने त्यांच्या जीवनकार्याचा, व्यक्तिमत्वाचा आणि अभ्यासू वृत्तीचा गौरव केला आहे असे म्हटले जात आहे.

नव्या युगाची हाक?

भारताची जगामध्ये चौथी अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठा उंचावली आहे आणि वाढली आहे. अशा वेळी लोकशाहीच्या विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये परस्पर समन्वय व सहकार्य असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन, थरूर यांनी सरकारने दिलेल्या निमंत्रणाचा नम्रपणे स्वीकार केला आहे. हे निवेदन स्वीकारताना त्यांनी जे भाषण पत्रकारांसमोर केले ते खरोखरच लक्षणीय आहे. त्यांच्या भाषणाचा सार सांगताना त्यांनी असे म्हटले की, ‘मी नेहमी भारत प्रथम या भूमिकेवर भर देतो. आजवर मला देशाने कसोटीच्या वेळी ज्या ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या मी समर्थपणे पेलवल्या आहेत आणि जनतेची आणि देशाची सेवा करण्याचा मनोमन प्रयत्न केला आहे.’ यावेळी सुद्धा आपण देशाची व जनतेची सेवा करण्याची संधी घेऊ, लोकांच्या आदराला पात्र ठरू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवेदनातील प्रांजळपणा, दूरदर्शीत्व आणि तेवढीच समाजशास्त्राrय दृष्टी आम्हाला महत्त्वाची वाटते.

ज्या पद्धतीने त्यांनी समस्यांचे विश्लेषण करून त्यावर उत्तरे शोधली आहेत त्या पद्धतीने इतका सूक्ष्म आणि बारकाईने विचार भारतातील कोणी संसदपटू करीत असतील असे वाटत नाही. त्यामुळे विरोधी पक्षात असले तरी त्यांचा समतोल दृष्टीकोन आणि देशाच्या हितासाठी त्यांनी दाखविलेले प्राधान्यक्रम महत्त्वाचे वाटतात. काँग्रेस पक्षाने दिलेल्या चार नावात त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. तरीही पंतप्रधानांनी त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन ही निवड केली आहे. त्यामुळे त्यांची ही निवड निश्चितच सार्थ, उतराई आणि तेवढीच सकारात्मक दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.