खराब जागतिक संकेतात शेअरबाजारात मोठी घसरण
सेन्सेक्स 715 अंकांनी तर निफ्टी 191 अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमतीत 4.5 टक्के वाढ
अमेरिका आणि इराण यांच्यातील हल्ले थांबायला तयार नसून कच्चे तेल अर्थात ब्रेंट व्रुडचे दर बुधवारी साडेचार टक्के वाढल्याने याने बाजारात दबाव निर्माण झाला. आयटी, बँक व रियल्टी समभागांची कमकुवत कामगिरी बाजाराला खाली खेचण्यासाठी सहाय्यभूत ठरली.
त. भा. वृत्तसंस्था मुंबई
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 715 अंकांनी घसरुन 76755 अंकांवर बंद झाला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 191 अंकांच्या नुकसानीसोबत 23996 च्या स्तरावर बंद झालेला दिसून आला. कच्च्या तेलाच्या दराने बुधवारी 95 डॉलर प्रति बॅरल ही सर्वाधिक वाढ एकाच दिवशी नेंदवली व याने बाजाराचा मूडच निराशाजनक करुन टाकला. निफ्टी बँक निर्देशांक 708 अंकांनी घसरत 57126 च्या स्तरावर तर आयटी निर्देशांक 434 अंकांनी घसरत 28549 अंकांवर बंद होताना दिसला. निफ्टीतील 50 समभागांपैकी 40 हे दबावात बंद झाले तर सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग नुकसानीसोबत बंद झाले होते. बँक निफ्टीत पाहता 14 पैकी 12 बँकांची कामगिरी कमकुवत राहिली होती. रुपया तब्बल 32 पैसे इतका कमकुवत झाला होता.
क्षेत्रांची कामगिरी
विविध क्षेत्राच्या निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास फक्त ऑटो, एफएमसीजी, सीपीएसई यांची कामगिरी सकारात्मक राहिली होती. दुसरीकडे कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, इन्फ्रा, आयटी, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी या क्षेत्रांची कामगिरी निराशाजनक पाहायला मिळाली.
हे समभाग वधारले
बुधवारी शेअरबाजारात पाहता निफ्टीत बजाज ऑटो, नेस्ले इंडिया, टाटा कंझ्युमर, पॉवरग्रिड कॉर्प, ओएनजीसी व एचयुएल यांचे समभाग 0.56 टक्के ते 5.72 टक्के इतके वाढलेले होते. मिडकॅपमध्ये एम आणि एम फायनॅन्शीयल्स, कल्याण ज्वेलर्स, पुनावाला फिन, पॉलीकॅब, सुप्रीम इंडस्ट्रिज, ऑईल इंडिया हे तेजीत होते.
हे समभाग घसरले
तर निफ्टीत बाजाराला खाली खेचण्यात इंडिगो, जियो फायनॅन्शीयल्स, इन्फोसिस, डॉ. रे•िज लॅब्ज, एसबीआय, टाटा मोटर्स पीव्ही यांचा वाटा अधिक होता. हे सर्व समभाग 1.8 टक्के ते 3.5 टक्के इतके घसरले होते. मिडकॅपमधील बंधन बँक, ओरॅकल फायनान्स, एम्फसीस, लुपीन, जेएसडब्ल्यू इन्फ्रा, गोदरेज प्रॉपर्टीज यांची कामगिरी निराशादायी राहिली होती.