शर्मिष्टा पनोली हिला जामीन संमत
नवी दिल्ली : कथित धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपावरुन कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या शर्मिष्टा पनोली या युट्यूब इन्फ्ल्युएन्सरला कलकत्ता उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. तिला अटक केल्यानंतर जवळपास एक आठवड्याने तिला जामीन संमत करण्यात आला आहे. तिने एका इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी पनोली हिला हरियाणातील गुरुग्राम येथून कोलकाता पोलिसांनी अटक केली होती. नंतर तिला कोलकाता येथील कनिष्ठ न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.
कनिष्ठ न्यायालयाने तिला 13 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. नंतर तिने कोलकाता उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी दिला दिलासा दिला नव्हता. तसेच पोलिसांनी स्टेशन डायरी सादर करावी, असा आदेश दिला होता. मात्र, गुरुवारी तिला सशर्त जामीन संमत करण्यात आला आहे. 10 हजार रुपयांच्या स्वहमीपत्रावर तिची सुटका करावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. तिला योग्य ती सुरक्षा पुरविण्यात यावी, असाही आदेश देण्यात आल्याची माहिती तिच्या वकीलांनी दिली आहे.
संतापाची भावना
शर्मिष्टा पनोली हिला अटक केल्यानंतर समाजात संतापाची भावना निर्माण झाल होती. तिने आपली पोस्ट काढून टाकली असताना आणि स्वत:हून क्षमायाचना केली असतानाही तिला अटक करण्यात आल्यामुळे अनेक वकील आणि इतर क्षेत्रांमधील मान्यवरांनी पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. तिला झालेली अटक हा अन्याय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
प्रकरण नेमके काय...
शर्मिष्टा पनोली ही कायद्याच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी असून ती 19 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकून काही प्रश्न उपस्थित केले होते. पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सिंदूर अभियानावर बॉलिवुड गप्प का आहे, असा प्रश्न तिने विचारला होता. यामुळे विशिष्ट धर्माच्या लोकांच्या भावना दुखाविल्याची तक्रार वजाहत खान नावाच्या व्यक्तीने केली होती. त्यामुळे कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथे जाऊन तिला अटक केली होती.