पॅरा-अॅथलेटिक्समध्ये शर्मिलाचे ऐतिहासिक सुवर्णपदक
वृत्तसंस्था, ग्लासगो : शर्मिला धनकर हिने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या इतिहासात पॅरा-अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरून इतिहास रचला. त्याचवेळी, उंच उडीपटू सर्वेश कुशारे आणि वेटलिफ्टर वल्लुन अजय बाबू यांनी प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले. अशा प्रकारे या बहुक्रीडा स्पर्धेत भारतासाठी हा दिवस अत्यंत यशस्वी ठरला.
सोमवारी रात्री उशिरा, शर्मिलाने महिलांच्या गोळाफेक ‘इ57’ प्रकारात 9.81 मीटरची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिच्या या विजयामुळे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत पॅरा-अॅथलेटिक्समधील पदकासाठी भारताची 20 वर्षांची प्रतीक्षा संपली. वादग्रस्त परिस्थितीत भारताने घेतलेल्या आक्षेपानंतर आणखी एक भारतीय खेळाडू शिल्पा शैला हिला कांस्यपदक देण्यात आले. शैलाने 7.26 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. सुऊवातीला नायजेरियाच्या युचारिया इयाझी हिला कांस्यपदकासाठी पात्र ठरवण्यात आले होते, परंतु आक्षेप आणि अधिकृत पुनरावलोकनानंतर तिची एकमेव वैध कामगिरी ‘फाऊल’ (अवैध) ठरवण्यात आली. यामुळे सुऊवातीला चौथ्या स्थानावर असलेल्या शैलाला कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत भारताला अशा प्रकारे दोन पदके मिळाली.

कुशारेचे ऐतिहासिक यश
त्यानंतर लगेचच राष्ट्रीय विक्रमवीर कुशारे याने पुऊषांच्या उंच उडी प्रकारात रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरून इतिहास रचला. 31 वर्षीय कुशारे याने 2.25 मीटरची उंची पार केली. जमैकाच्या रोमेन बेकफोर्ड आणि इंग्लंडच्या जॅक किमानी या दोघांनाही 2.28 मीटरची उंची गाठण्यात अपयश आले. त्यानंतर ‘काउंटबॅक’च्या नियमानुसार बेकफोर्डने सुवर्णपदक जिंकले, तर किमानीला 2.20 मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. चार वर्षांपूर्वी बर्मिंगहॅममध्ये तेजस्विन शंकरने कांस्यपदक जिंकले होते, जे या प्रकारातील भारताचे एकमेव पदक होते. त्याच्यापेक्षा कुशारेने अधिक चांगली कामगिरी केली. तेजस्विनने या आठवड्यात ाgरू होणाऱ्या ’डेकॅथलॉन’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, 2.05 मीटरची उंची गाठण्यात अपयश आल्यानंतर माघार घेतली. आदर्श रामने 2.15 मीटरसह पाचवे स्थान मिळवले. 
भारताच्या वेटलिफ्टर्सची दमदार कामगिरी सुरूच
वेटलिफ्टिंग हे भारतासाठी पदके मिळवून देणारे प्रमुख क्षेत्र ठरले आहे. 21 वर्षीय वल्लुरी अजय बाबूने पुऊषांच्या 79 किलो वजन गटात मलेशियाच्या एरी हिदायत मुहम्मदसोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीनंतर रौप्यपदक जिंकले. आंध्र प्रदेशच्या या वेटलिफ्टरने एकूण 330 किलो (स्नॅचमध्ये 149 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 181 किलो) वजन उचलले. हिदायतने 331 किलोची (147 किलो आणि 184 किलो) एकूण कामगिरी करत स्पर्धेतील विक्रम प्रस्थापित केल्यामुळे अजय बाबूचे सुवर्णपदक अवघ्या एका किलोच्या फरकाने हुकले. ‘क्लीन अँड जर्क’ प्रकारातील रोमांचक लढतीत दोघांनीही अनेकदा स्पर्धा विक्रम मोडले.
अजय बाबूच्या या रौप्यपदकामुळे या स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंग पदकांची संख्या सहावर पोहोचली आहे. सोमवारचा दिवस भारतासाठी आधीच यशस्वी ठरला होता. कारण बिंद्याराणी देवीने 58 किलो गटात कांस्यपदक मिळवले होते. बिंद्याराणीने जोरदार झुंज दिली, पण 199 किलो (87 किलो आणि 112 किलो) वजन उचलून तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नायजेरियाच्या राफियातू फोलाशादे लावाल हिने विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले.

100 मीटर हर्डल्समध्ये तेजस शिर्सेच्या आशांवर दुखापतीमुळे पाणी
दरम्यान, राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिर्से या स्पर्धेतील पुऊषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या (हर्डल्स) अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला, परंतु दुखापत झाल्यामुळे अंतिम शर्यतीत तो शेवटच्या स्थानावर राहिला. 24 वर्षीय शिर्से याने ‘हीट 1’मध्ये 13.76 सेकंदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले आणि एकूण सहाव्या क्रमांकासह अंतिम फेरी गाठली. मात्र सायंकाळी झालेल्या अंतिम शर्यतीत दुखापतग्रस्त शिर्सेला 15.39 सेकंदांची वेळच नोंदवता आली आणि तो आठव्या व शेवटच्या स्थानावर राहिला. त्याचा राष्ट्रीय विक्रम 13.27 सेकंदांचा आहे.