शरजील इमामच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणी व्हावी
सर्वोच्च न्यायालयाचा दिल्ली उच्च न्यायालयाला निर्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाला फेब्रुवारी 2020 मये झालेल्या दिल्ली दंगलीशी संबंधित प्रकरणी शरजील इमामच्या जामीन याचिकेवर लवकरच सुनावणी करण्याचा निर्देश दिला आहे. घटनेच्या अनुच्छेद 32 अंतर्गत जामिनाची मागणी करण्यात आलेल्या याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नसल्याचे न्यायाधीश बेला त्रिवेदी आणि एस.सी. शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
जामीन याचिका 2022 पासून प्रलंबित असल्याचे इमामचे वकील सिद्धार्थ दवे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. उच्च न्यायालय याप्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे.
घटनेच्या अनुच्छेद 32 अंतर्गत दाखल ही रिट याचिका असल्याने आम्ही यावर विचार करण्यासाठी इच्छुक नाही. परंतु जामीन याचिकेवर लवकर सुनावणी करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्याची याचिकाकर्त्याला मुभा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या दंगलीचा सूत्रधार असल्याचा आरोप इमामवर आहे. या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान हिंसा झाली होती.