व्हर्लपुल इंडियाच्या समभागात घसरण सुरुच
नवी दिल्ली :
वॉशिंगमशीनसह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्हर्लपुल इंडिया या कंपनीचा समभाग सध्या घसरणीत असल्याचे पाहायला मिळते आहे. एक-दोन दिवसापूर्वी या कंपनीच्या समभागाने 52 आठवड्यानंतर नीचांकी स्तर गाठला होता. व्हर्लपुल इंडियाची प्रवर्तक कंपनी ‘व्हर्लपुल मॉरिशस’ या आठवड्यामध्ये ब्लॉक डीलच्या माध्यमातून 24 टक्के इतका वाटा विक्री करण्याचा विचार करते आहे. या बातमीने व्हर्लपुलच्या समभागावर परिणाम दिसून आला आणि चार टक्के इतका हा समभाग घसरणीत राहिला.
कर्जाचा भार कमी करणार
24 टक्के हिस्सेदारी विक्रीचा व्यवहार 45.1 कोटी डॉलरना होणार असल्याचे समजते. व्हर्लपुल या कंपनीची सहकारी कंपनी ब्लॉक डीलअंतर्गत वरील विक्री व्यवहार करणार आहे. रॉयटर या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. व्हर्लपुल इंडियामध्ये त्यांच्या सहकारी कंपनीचा 75 टक्के इतका वाटा आहे. सदरचा ब्लॉक डील अंतर्गतचा व्यवहार हा कंपनी कर्जाचा भार कमी करण्यासाठी करत असल्याचेही सांगितले जात आहे. वाढत्या स्पर्धेसोबतच किमतीचा दबाव कंपनीला झेलावा लागतो आहे.
समभागावर परिणाम
मंगळवारी कंपनीचा समभाग 4 टक्के घसरत 1271 रुपयांवर आला होता. त्यानंतर बुधवारीही बीएसईवर कंपनीच्या समभागात घसरणच राहिली होती. बुधवारी समभागाचा भाव 2.46 टक्के घसरत 1255 रुपयांवर खाली आला होता.डिसेंबरच्या तिमाहीत व्हर्लपुलने 1535 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.