आज 2 कंपन्यांचे समभाग होणार खुले
क्वाडेंट फ्युचर टेक, कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट यांचा समावेश
वृत्तसंस्था/ मुंबई
दोन कंपन्यांचे आयपीओ मंगळवारी भारतीय शेअर बाजारामध्ये खुले होणार आहे. क्वाड्रेंट फ्युचर टेक लिमीटेड आणि कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट इनविट यांचा यामध्ये समावेश आहे. क्वाड्रेंट फ्युचरचा आयपीओ 7 जानेवारीला गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 9 जानेवारीपर्यंत यामध्ये बोली लावता येणार आहे.
कंपनीचे समभाग बीएसई आणि एनएसईवर 14 जानेवारी रोजी सूचीबद्ध होणार आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 290 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीचे सध्याचे गुंतवणूकदार किंवा प्रवर्तक एकही समभाग विकणार नाहीत. आयपीओकरिता 275-290 रुपये प्रती समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली असून एका लॉटकरिता (50 समभाग) गुंतवणूक करायची असल्यास 14500 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतीय रेल्वेशी संबंधित कवच या प्रकल्पासाठी कंपनी आपले योगदान देते. रेल्वे नियंत्रण आणि सिग्नलींग व्यवस्था विकसित करण्याचे काम कंपनी करते.
कॅपिटल इन्फ्रा टस्^ट इनविट ही कंपनी 1578 कोटीचा आयपीओ मंगळवारी खुला करत आहे. ऑफर फॉर सेल अंतर्गत 501 कोटी रुपयांचे समभाग सध्याचे गुंतवणुकदार विक्री करणार आहेत. तर कंपनी 1077 कोटीचे समभाग विक्री करणार आहे. 99-100 प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली असून कमीत कमी 150 समभागांसाठी गुंतवणुकदारांना बोली लावता येणार आहे. याकरिता 15000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.