For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सलग तेराव्या सत्रात तेजीसह शेअरबाजाराचा विक्रम

06:31 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
सलग तेराव्या सत्रात तेजीसह शेअरबाजाराचा  विक्रम
Advertisement

सेन्सेक्स 195 अंकांनी वधारला : आयटी, बँकिंग समभाग तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी व महिन्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअरबाजार आयटी, बँकिंग क्षेत्राच्या मजबुत कामगिरीमुळे तेजीसोबत नव्या विक्रमी स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स 195 अंकांच्या वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकाने सलग 13 व्या सत्रात तेजी कायम राखत नवा विक्रम नोंदवला आहे.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 195 अंकांच्या वाढीसोबत 82,559 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 43 अंक वाढत 25,278 अंकांवर बंद झाला. सोमवारी शेअरबाजारात उत्सवी हंगामापूर्वीचा उत्साह दिसून आला. आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांची खरेदी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात केलेली पाहायला मिळाली. सोमवारच्या सत्रात टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि भारती एअरटेल यांनी बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला खरा पण बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक आणि आयटीसी यांनी बाजाराला तेजीत राहण्यासाठी मदत केली.

बजाज फायनान्सचे समभाग 3.34 टक्के वाढत 7440 रुपयांवर बंद झाले तर बजाज फिनसर्व्हचे 3.23 टक्के वाढत 1841 रुपयांवर बंद झाले होते. एचसीएल टेकचे समभाग 3.05 टक्के वाढीसह 1807 रुपयांवर, इंडसइंड बँकेचे 1.63 टक्के वाढत 510 रुपयांवर बंद झाले. घसरणीत असणाऱ्या समभागांचा विचार केल्यास त्यामध्ये टाटा मोटर्सचा सर्वात वरचा नंबर लागतो. टाटा मोटर्स समभाग 1.69 टक्के घसरत 1093 रुपयांवर बंद झाला तर एनटीपीसी 1.5 टक्केसह 410 रुपयांवर, भारती एअरटेल 1.12 टक्के घसरणीसोबत 1571 रुपयांवर बंद झाला. महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभागही 1 टक्के घसरणीसोबत 2777 रुपयांवर बंद झाले.

सोमवारी बाजारात आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांनी दिवस गाजवला. या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीमध्ये रस घेतला होता. आयटी, बँकिंग आणि एनर्जी क्षेत्रातील समभागांचीही खरेदी दिसून आली. धातू, फार्मा, ऑटो आणि रियल्टी या कंपन्यांच्या समभागात विक्रीचा जोर दिसला. निफ्टी आयटी 0.44 टक्के वाढत 42,976 वर बंद झाला तर निफ्टी बँक 0.17 टक्के वाढत 51,440 अंकांवर बंद झाला. ऊर्जा निर्देशांक 0.06 टक्के वाढत, धातू निर्देशांक 1.04 घसरणीसह, फार्मा निर्देशांक 0.99 टक्के घसरणीसोबत व्यवहार करत होता.

जागतिक बाजारात अमेरिकेतील बाजार सोमवारी बंद होते. आशियाई बाजारात जपानचा निक्केई तेजीत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी काहीसा घसरणीत व्यवहार करत होता. हाँगकाँगचा हँगसेंग घसरणीत व्यवहार करत होता.

Advertisement
Tags :

.