शार्दुलची हॅट्ट्रीक, रहाणे, लाड यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / मुंबई
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या 2025 च्या रणजी क्रिकेट हंगामातील इलाईट अ गटातील सामन्यात मुंबईने पहिल्याच दिवशी आपले निर्विवाद वर्चस्व राखताना मेघालयला पहिल्या डावात 86 धावांत उखडले. त्यानंतर मुंबईने पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 213 धावा जमविल्या. मुंबईच्या शार्दुल ठाकुरने हॅट्ट्रीक साधली तर अजिंक्य रहाणे व सिद्धेश लाड यांनी नाबाद अर्धशतके झळकविली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेघालयाचा डाव 24.3 षटकात 86 धावांत ऑटोपला. मेघालय संघातील फुकेनने 28 धावा जमविल्या. डावाला सुरुवात झाल्यानंतर तिसऱ्या षटकाअखेर मेघालयाची स्थिती 5 बाद 2 अशी होती. ठाकुरच्या गोलंदाजीवर अनिरुद्ध खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा चित झाला. ठाकुरचा या षटकातील हा चौथा चेंडू होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर ठाकुरने सुमितकुमारला खाते उघडण्यापूर्वीच मुलानीकरवी झेलबाद केले. त्यानंतर सहाव्या चेंडूवर शार्दुलने सचदेवचा त्रिफळा उडविला. शार्दुल ठाकुरने 43 धावांत 4 तर अवस्थीने 27 धावांत 3 तसेच डिसोजाने 14 धावांत 2 आणि मुलानीने 1 गडी बाद केला. मुंबईच्या पहिल्या डावाला दमदार सुरुवात झाली नाही. सलामीचा आयुष म्हात्रे केवळ 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सिद्धेश लाड यांनी दमदार फलंदाजी करत आपल्या संघाला सुस्थितीत नेले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 170 धावांची भागिदारी केली. रहाणे 1 षटकार आणि 9 चौकारांसह 83 तर सिद्धेश लाड 155 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 89 धावांवर खेळत आहेत. मुंबईने मेघालयावर 127 धावांची आघाडी घेतली आहे.
बडोदामध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात जम्मू काश्मिरने पहिल्या डावात 246 धावा जमविल्यानंतर यजमान बडोदा संघाने पहिल्या डावात 2 बाद 29 धावा जमविल्या होत्या. जम्मू काश्मिर संघातील वाधवानने 71, पारस डोगराने 43 तर व्ही. शर्माने 43 धावा जमविल्या. बडोदा संघातर्फे पी. महेशने 62 धावांत 3 तर निनाद राठवने 43 धावांत 5 गडी बाद केले. कटक येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात सेनादलाने ओडीशाला पहिल्या डावात 180 धावांवर रोखले. त्यानंतर सेनादलाने पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 85 धावा जमविल्या. ओडीशा संघातील राजेश मोहांतीने 60 धावा केल्या. सेनादलाच्या जयंत गोयातने 3 तर सुनीलकुमार राऊळने 4 गडी बाद केले. सोलापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात त्रिपुरा संघाने महाराष्ट्र विरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 230 धावा जमविल्या. एस. शरथ 66 धावांवर खेळत आहे. महाराष्ट्रातर्फे हितेश वळुंजने 59 धावांत 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मेघालय प. डाव 24.3 षटकात सर्वबाद 86 (फुकेन 28, शार्दुल ठाकुर 4-43, अवस्थी 3-27, डिसोजा 2-14, मुलानी 1-1), मुंबई प. डाव 59 षटकात 2 बाद 213 (सिद्धेश लाड खेळत आहे 89, रहाणे खेळत आहे 83) जम्मू काश्मिर प. डाव 246, बडोदा प. डाव 2 बाद 29,ओडीशा प. डाव सर्वबाद 180, सेनादल प. डाव 2 बाद 85,त्रिपुरा प. डाव 5 बाद 230 (शरथ खेळत आहे 66, वळुंज 3-59)