शरथ कमलचा टेबल टेनिसला निरोप
वृत्तसंस्था / चेन्नई
भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेबल टेनिसपटू शरथ कमलने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 25 ते 30 मार्च दरम्यान चेन्नईत होणाऱ्या विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत शरथ कमलने भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. शरथ कमलची ही त्याच्या वैयक्तिक टेबल टेनिस कारकिर्दीतील शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा राहील.
42 वर्षीय शरथ कमलने आपल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस क्षेत्राला चेन्नईतच प्रारंभ केला होता. आता तो टेबल टेनिसला निरोपही चेन्नईमध्येच देणार आहे. शरथ कमलने आपल्या टेबल टेनिस कारकिर्दीमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सात सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. तसेच त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन कांस्य पदकेही मिळविली आहेत. त्याने आतापर्यंत पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. गेल्यावर्षी झालेली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ही त्याची शेवटची राहिली आहे. जागतिक टेबल टेनिसपटूंच्या मानांकन यादीत शरथ कमल 42 व्या स्थानावर आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अॅथलिट्स आयोगाचे शरथ कमल उपाध्यक्ष आहेत. नवोदित टेबल टेनिसपटूंना संधी मिळावी यासाठी आपण योग्यवेळी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. टेबल टेनिस क्षेत्रातून घेतलेल्या निवृत्तीनंतरही क्रीडा क्षेत्रात आपण निगडीत राहू, अशी ग्वाही शरथ कमलने दिली आहे