Sharangdhar Deshmukh : कोल्हापुरात कॉंग्रेसला खिंडार, माजी नगरसेवक करणार शिंदे सेनेत प्रवेश
आमदार सतेज पाटलांसमोर कॉंग्रेसमधील गळती रोखण्याचे आव्हान
कोल्हापूर : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी पहायला मिळत आहे. दरम्यान, आता कोल्हापूरातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. कॉंग्रेसचे गटनेत आणि आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत भेट घेतली आहे.
भेटी दरम्यान, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांचे चिरंजीव अश्पाक आजरेकर सोबत होते. लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे शारंगधर देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात आणखी किती राजकीय नाट्य रंगणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश श्रीरसागर यांच्या उपस्थितीत देशमुख यांनी ही भेट झाली. लवकरच शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे शारंगधर देशमुख यांनी जाहीर केले असल्याने आता कोल्हापुरात आणखी कोणते राजकीय नाट्य रंगणार?, अशी चर्चा आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना कॉंग्रेसमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आणि आमदार सतेज पाटील यांच्या समोर असल्याचे बोलले जात आहे.
सध्या महापालिकेसाठी सर्वच राजकीय गटांत तणावाचे वातावरण आहे. तसेच कोल्हापूर महापालिकेसाठी अनेक इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे. यामध्ये आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार कुणाला तिकीट मिळणार, कोणत्या प्रभागातून मिळणार यासाठी सेटिंग्ज लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता प्रत्यक्षात मात्र कॉंग्रेससमोर पक्षाला लागलेली गळती पुन्हा कशी भरुन काढता येणार हेच मोठे आव्हान असणार आहे.