For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘तुळशी गाव विकणे आहे’ फलकाची दखल; शरद पवारांकडून 50 लाखांची मदत: दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा

08:34 PM Nov 01, 2026 IST | ABHIJEET RANJANE
‘तुळशी गाव विकणे आहे’ फलकाची दखल  शरद पवारांकडून 50 लाखांची मदत  दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. माढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देत त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणीटंचाईमुळे चर्चेत आलेल्या तुळशी गावालाही त्यांनी भेट दिली. यावेळी गावातील परिस्थितीची माहिती घेत त्यांनी दुष्काळ निवारणासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

माढा तालुक्यातील तुळशी गावातील भीषण पाणीटंचाईकडे प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी ‘तुळशी गाव विकणे आहे’ असे फलक लावले होते. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे या माध्यमातून मांडण्यात आले होते. या घटनेची राज्यभर चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी हे फलक हटवले होते.

Advertisement

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी तुळशी गावाला भेट देत ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. गावातील पाणीटंचाई, शेतीची परिस्थिती आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी 50 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीचा उपयोग दुष्काळग्रस्त भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी करण्याचा उद्देश आहे.

यावेळी 1972 मधील भीषण दुष्काळाच्या आठवणींनाही पवार यांनी उजाळा दिला. त्या काळात आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न केले होते, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकारचेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्यातील दुष्काळी भागांचा दौरा पूर्ण झाल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीवर कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत सुमारे महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली.

तुळशी गावातील ग्रामस्थांनी पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या अनोख्या आंदोलनानंतर आता शरद पवार यांच्या भेटीमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.