उल्हासनगर प्रकरणामुळे राज्याची वाटचाल कोणत्या दिशेला आहे ते समजतं; गोळीबार प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया
उल्हासनगर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या घटनेबद्दल सरकारला जबाबदार धरले असून या घटनेमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "राज्यात सत्तेचा गैरवापर केला जात आहे, अशी तक्रार येत आहे. गोळीबार आणि तत्सम गोष्टी व्हायला लागल्या आणि राज्य सरकारने याबाबतीत बघ्याची भूमिका घेतली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चालले आहे, हे कळत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अशा घटना खुपच चिंताजनक आहेत." असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील दौरे वाढले आहेत. महाराष्ट्रातील लोकांसंबंधी त्यांची आस्था वाढत आहे, असे दिसते आणि ही चांगली बाब आहे. माझी पंतप्रधानांकडे एव्हढीच मागणी आहे की, गुजरातला ते गेल्यानंतर नेहमीच काहीतरी देण्याचे औदार्य दाखवतात. त्याचपद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर काहीतरी देण्याची घोषणा केली तर माझ्यासह राज्यालाही आनंद होईल.” अशी खोचक टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर केली.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहूजन आघाडीच्या प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीअंतर्गत सकारात्मक चर्चा झाली असल्याचं म्हटलं आहे.ते म्हणाले, “मविआच्या बैठकीबाबत माझ्या सहकाऱ्यांनी मला वेळोवेळी माहिती दिली आहे. त्यांनी ही अतिशय चांगली चर्चा झाल्याचे सांगितलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्यासाठी जो आग्रह केला, तो अतिशय योग्य असून केवळ पक्ष एकत्र येऊन चालणार नाही, तर आपल्याला काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल. निवडणुकीत जागा जिंकणे हे महत्त्वाचे असले तरी जागा कशासाठी जिंकायच्या, तसेच कोणत्या कार्यक्रमावर भर देऊन त्या जिंकायच्या यावर चर्चा झालीच पाहीजे. नाहीतर नंतर मतभेद होतात त्यामुळे पुढील मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा झाली पाहीजे, अशी प्रकाश आंबेडकरांची अपेक्षा असून ती अगदी योग्य आहे, असे मला वाटते.” असा खुलासा त्यांनी केला.