Maharashtra Lagislative Council Election शरद पवार गटातील ३ आमदार महायुतीच्या बैठकीला हजर, सोलापूरची राजकिय समीकरणे बदलणार?
त. भा. संवाद प्रतिनिधी, सोलापूर
विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (११) शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तीन आमदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार अभिजित पाटील, नारायण पाटील आणि उत्तम जानकर सहभागी झाले होते. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना चालना मिळाली आहे.
शरद पवार पक्षाचे आमदार बैठकीला
सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे चार आमदार असून माढा, करमाळा आणि माळशिरस मतदारसंघाचे आमदार महायुतीच्या बैठकीत उपस्थित राहिल्याचे विशेष लक्षवेधी ठरले. या घडामोडींमुळे विधान परिषद निवडणुकीत मतदानाची दिशा काय राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
गुरुवारी (दि. १८) जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून वसंत देशमुख तर महायुतीकडून राजेंद्र राऊत रिंगणात आहेत. या निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे मानले जात आहे.
पक्षांतराबाबत कोणतीही भूमीका नाही
दरम्यान, या बैठकीनंतर संबंधित आमदारांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त होत असले तरी कोणत्याही नेत्याने पक्षांतराबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत सोलापूरच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे आकार घेतात, याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
वसंतराव देशमुखांमागे अदृश्य हात
दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या मागे अदृश्य मते असल्याचा दावा केला होता. आता याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीने थेट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चार पैकी तीन आमदारांनाच गळाला लावले आहे. विशेष म्हणजे हे तीनही आमदार उघडपणे महायुतीसोबत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच महाविकास आघाडीची वाट बिकट होत चालल्याचे दिसून येते.
उमेदवारी अर्ज दाखल करतानाच महाविकास आघाडीत मोठा घोळ झाला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज सूचकाची सही बनावट असल्याचे समोर आल्याने काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीची जागा काँग्रेसला सुटली असली तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला उमेदवारी देण्याची वेळ काँग्रेसवर आली. विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदारही उपस्थित होते. त्यामुळे त्याचवेळी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे प्रकर्षाने जाणवले होते.