महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राष्ट्रवादीसह ‘मविआ’ची वाढली ‘पॉवर’! शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याने जिह्यात राजकीय घुसळण

10:00 PM Sep 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sharad Pawar Kolhapur
Advertisement

अनेक नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मविआ’चे अनेक नेते भेटीला

कृष्णात चौगले कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे मरगळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह ‘मविआ’ची ‘पॉवर’ वाढली आहे. दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांनी शरद पवार यांची वैयक्तिक भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणासाठी इच्छूकांची संख्या वाढली आहे. तसेच जिह्यातील महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनीही पवार यांची भेट घेऊन जागा वाटपासह विधानसभेच्या मोर्चेबांधणीवर चर्चा केली आहे. पवार यांच्या दौऱ्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी धास्ती घेतली असून त्यांची पुढील रणनिती काय असू शकते याचा त्यांच्याकडून अंदाज बांधला जात आहे.

Advertisement

देशाच्या राजकारणात ‘शरद पवार’ या नावात मोठी ताकद आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी टाकलेल्या राजकीय डावपेचामुळे अनेकदा विरोधक घायाळ झाले आहेत. त्यांच्या एका वाक्यात अनेक राजकीय संदर्भ जोडलेले असतात. कागलच्या सभेमध्ये त्यांनी 1980 साली त्यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार निवडून आले असल्याचे सांगितले. पण निवडणुकीनंतर ते विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत 56 आमदार दुसऱ्या पक्षात गेले. पण त्यानंतर पुढील पाच वर्षात झालेल्या निवडणुकीमध्ये ते सर्व आमदार पराभूत झाल्याचे पवार यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. त्यांनी हा राजकीय संदर्भ देऊन अजित पवार गटात सहभागी झालेल्या आमदारांना अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. आपला ‘वरदहस्त’ ज्या उमेदवारांवर असतो, तोच उमेदवार निवडून येतो असेही पवार यांनी आपल्या भाषणातून सुचित केले. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांनी वस्तादांच्या ‘गेम प्लॅन’ची काहीअंशी भिती घेतली आहे.

Advertisement

समरजीत यांच्याकडे जाणार राष्ट्रवादीचे जिल्हा नेतृत्व
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर जिह्यात एकाकी पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे ‘मास लीडर’ ची पोकळी होती. पण शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे ही पोकळी भरून निघाली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीचे जिल्हा नेतृत्व समरजीत यांच्याकडे जाण्याची शक्ता आहे. शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे चार ते पाच तालुक्यात असणारे नेटवर्क, विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षात कागल विधानसभा मतदारसंघात ठेवलेला संपर्क हे राष्ट्रवादीबरोबरच महाविकास आघाडीसाठी फायद्याचे ठरणार आहे.

‘मविआ’ची धुरा आमदार सतेज पाटील यांच्याकडे
पवार यांच्या तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांची भेट घेतली. जिह्यातील ‘मविआ’च्या घटक पक्षांची एकत्रित मोट बांधून अधिकाधिक जागा निवडून आणण्याची धुरा पवार यांनी सतेज पाटील यांच्याकडे दिली असून त्यानुसार आमदार पाटील व पवार यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचे समजते.

कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भिती, पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
पवार यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये घेतलेल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकांनी सोयीच्या राजकारणाची भिती व्यक्त केली. जिल्ह्यातील ‘मविआ’ आणि महायुतीचे अनेक नेते सहकारातील राजकारणाच्या माध्यमातून एकत्र आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून सोयीचे राजकारण होण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ‘मी तुझ्या मतदारसंघात लक्ष घालत नाही, तू माझ्या घालू नकोस’ अशी मिलीभगत नेत्यांमध्ये झाली तर आपल्याला कागलसह अन्य मतदारसंघात फटका बसू शकतो असे कार्यकर्त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भितीबाबत पवार कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

कागल, राधानगरी, चंदगड आणि इचलकरंजीवर केला जाऊ शकतो दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जिह्यातील पाच जागा राष्ट्रवादीकडे घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. पण राष्ट्रवादीकडे सद्यास्थितीत कागल (समरजीत घाटगे), राधानगरी (के.पी.पाटील), चंदगड (नंदाताई बाभूळकर), इचलकरंजी (मदन कारंडे) या चार इलेक्टिव मेरीट असलेल्या जागांवर दावा केला जाऊ शकतो अशी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे.

Advertisement
Tags :
MVANCPPolitical infiltrationsharad pawar
Next Article