Shekhar Nikam Meet Sharad Pawar: कोकणात ‘AI’ केंद्र स्थापनेसाठी लागा कामाला!
या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
चिपळूण : कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सेंटर स्थापन करण्याच्यादृष्टीने माजी केंद्रीय कृषीमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे आमदार शेखर निकम यांना मुंबईत बोलावून त्यांच्यावर कोकणात ‘एआय’चा वापर वाढवण्याच्यादृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली.
त्याचबरोबर सिंधुदुर्गमधील ओरोस येथील शरद कृषी भवनकडेही गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर अजित पवार गटात गेलेले आमदार शेखर निकम आणि शरद पवार या दोघांमध्ये पक्ष विभाजनानंतरचा पहिलाच प्रत्यक्ष संवाद होता. त्यामुळे या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येऊन राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.
मात्र सध्या तरी दोघांनीही कोकणचा विकास हेच प्राधान्य असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत ‘सोडून गेल्याबद्दल’ कोणतीही चर्चा न होता केवळ कोकणच्या विकासाची दिशा यावर सखोल चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. कोकणसारख्या निसर्गसमृद्ध भागात जर शाश्वत शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली, तर येथील शेती अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळू शकते, हे ओळखून पवार यांनी शनिवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शनिवारी सकाळी 10 वाजता भेटीसाठी आमदार निकम यांना बोलावले.
या भेटीत झालेल्या चर्चेनंतर पवार यांनी कोकणातील कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासावर भर देत शेखर निकम यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवताना एआयच्या वापरातून कोकणातील शेती क्षेत्राला नवे उभारी देण्याची गरज आहे. त्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यांमध्ये एआय केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने तत्काळ प्रयत्न सुरु करा, त्यासाठी लागेल ती मदत मी करणार आहे.
त्याचबरोबर मी लवकरच कोकण द्रौयावर येणार असून त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. ओरोस येथील ‘शरद कृषी भवन’ या संकल्पनेला मूर्त रुप देण्यासाठी तू उद्यापासूनच कामाला लागा. हे केंद्र कोकणातील शेतकऱ्यांसाठी तांत्रिक ज्ञान व आधुनिक साधनसामग्रीचे महत्वाचे केंद्र ठरेल, असेही स्पष्ट केले.
या बैठकीत पवार व निकम यांच्यात कोकणातील पारंपरिक शेती पद्धती, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, हवामानानुसार पीक पद्धती, शाश्वत शेती आणि युवांना कृषी क्षेत्रात आकर्षित करण्यासाठी एआयच्या सहाय्याने उभारणी होणाऱ्या नव्या प्रकल्पांबाबत सखोल चर्चा झाली.
निकम यांनी कोकणातील स्थानिक शेती अडचणी, कोकणात पावसाळ्यामुळे येणारी आव्हाने आणि बाजारपेठेतील प्रश्न मांडले. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी कृषी तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, हवामान अंदाज, पीक संरक्षण, रोबोटिक्स, ड्रोन वापर अशा विविध संकल्पनांची माहिती दिली.
या चर्चेचा पुढील टप्पा म्हणून, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील कृषी संशोधन संस्था, स्थानिक विद्यापीठे व तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहभागाने लवकरच एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. कोकणात अत्याधुनिक एआय सेंटर उभारणीसाठी संभाव्य ठिकाणांची पाहणी व अभ्यास केला जाणार आहे.
या घडामोडीमुळे कोकणात आधुनिक कृषी क्रांतीचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेखर निकम यांनीही अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली असून भविष्यात कोकणातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकूणच राजकीय भूतकाळ झाकून भविष्यातील विकासाभिमुख भूमिका शरद पवार घेत असल्याचे या भेटीवरून स्पष्ट होत आहे. कोकणातील राजकीय आणि कृषी पातळीवर ही भेट दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते, असा विश्वास कृषी विभागातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.