शरद पवार आज बेळगावमध्ये
अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळ्याला राहणार उपस्थित
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शरद पवार सोमवार दि. 2 रोजी बेळगाव भेटीला येणार आहेत. सहकारमहर्षि कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त ते बेळगावला येत आहेत. दुपारी 3.30 वाजता इंद्रप्रस्थनगर रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे हा सोहळा होणार आहे. शरद पवार दुपारी कोल्हापूर येथून बेळगावला येणार आहेत. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील, महाराष्ट्राचे निवृत्त अधिकारी दिनेश ओऊळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील असणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.