ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, उजनीतील एआय डेटा सेंटरच्या पाणीवापरावरही भाष्य
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळ, पाणीटंचाई, दिल्लीतील इंडिया आघाडीचे आंदोलन आणि उजनी येथील प्रस्तावित एआय डेटा सेंटरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता अधोरेखित करताना पवार यांनी टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची माहिती दिली. जिल्ह्यातील 139 गावांना 135 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे, तर माढा तालुक्यात 110 टँकर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा या दोन्हींची मोठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुष्काळग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. यासंदर्भात दिल्लीतील बैठकीत तसेच मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतही विषय मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावर केंद्राकडे लक्ष
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीकडून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. निर्णय होत नसल्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी सांगितले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आणि संजय राऊत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, सध्या आपले प्राधान्य दुष्काळग्रस्त भागातील पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नांना असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन
राज्यात पाण्याची मागणी वाढत असल्याने उपलब्ध साठ्याचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे, असे पवार म्हणाले. पुणे परिसरातील खडकवासला आणि अन्य धरणांमधील पाणी जूनपर्यंत पुरवावे लागणार असल्याने त्याचा वापर जपून करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये यासाठी साठ्यावर लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उजनीतील एआय डेटा सेंटरबाबत काय म्हणाले?
उजनी येथे प्रस्तावित एआय डेटा सेंटरला काही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाबाबत विचारले असता, एआय प्रकल्प सुरू झाला म्हणजे पाणी संपेल असे नाही; मात्र पाण्याचा वापर जपून होणे महत्त्वाचे आहे, असे पवार यांनी सांगितले. आपण स्वतः उजनी परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांची मते जाणून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास प्रकल्पात योग्य त्या सुधारणा करण्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
यंदा पवार कुटुंब दिवाळी साजरी करणार नाही
दरम्यान, यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत येणारी ही पहिली दिवाळी असल्याने यंदा कोणताही सण साजरा न करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
