For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. पाटणकरांनी नव्या पिढीसमोर वैचारीक दृष्टीकोन ठेवला !

01:49 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
डॉ  पाटणकरांनी नव्या पिढीसमोर वैचारीक दृष्टीकोन ठेवला
Dr. Bharat Patankar
Advertisement

शरद पवार : डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त कार्यगौरव सत्कार सोहळा

पाटणकरांचे विचार देशाला मार्गदर्शक : खासदार शाहू छत्रपती

कोल्हापूर प्रतिनिधी

डॉ. भारत पाटणकर यांनी सर्वांना सोबत घेऊन जाती, वर्ग विरहीत संघटन उभे केले. समाजातील वंचितांचे प्रश्न सोडवले. दुष्काळग्रस्त भागाला समृद्ध करण्यातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी मांडलेले परिवर्तनाचे सूत्र यशस्वी झाले. नव्या पिढी समोर वैचारिक दृष्टकोन ठेवण्याचे महत्वाची काम त्यांनी केले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी केले.

Advertisement

शाहू स्मारक भवन येथे बुधवारी डॉ. भारत पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यगौरव सोहळा झाला. यावेळी ते बोलत होते. डॉ. पाटणकरांना मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ-मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी खासदार शाहू छत्रपती, खासदार विशाल पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शरद पवार म्हणाले, देशामध्ये धर्मांधता, जातीयवाद वाढत आहे, अशा काळात डॉ. पाटणकरांच्या परिवर्तनाच्या सूत्राची मांडणी महत्वाची ठरत आहे. पाटणकरांचा भाग तसा दुष्काळी होता. त्यामुळे त्या परिसरातील लोक उपजिविकेसाठी अन्य व्यवसाय, कामे करू लागली. पाटणकरांनी मात्र सर्वांना बरोबर घेऊन पर्यायी विकास निती मांडली. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी उपाययोजना राबवल्या. त्यावेळी पाटणकरांनी समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडला. त्यामुळे आटपाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले. सध्या देशात धर्मांधता आणि जातीयवादाचा प्रभाव वाढत आहे. त्यातून अनेक आव्हाने उभी आहेत. अशावेळी हा परिवर्तनाचा विचार उपयुक्त ठरणारा आहे.‘

Advertisement

खासदार शाहू छत्रपती म्हणाले, देशाला डाव्यांची परंपरा आहे. त्यांच्यामुळेच देशाला योग्य दिशा मिळाली आहे. हा वर्ग श्रीमंतासाठी नव्हे तर गरीबांसाठी काम करतो. डॉ. पाटणकरही नेहमी शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त, महिला यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत राहीले. त्यांच्या कामामुळे समाजातील अनेक समस्यांचे निराकरण झाले. त्यांनी संपूर्ण जीवन समाजातील उपेक्षीत घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी खर्ची घातले. सर्वसामान्यांसाठी झटणारे पाटणकर यांचे विचार देशाला मार्गदर्शक आहेत.

खासदार विशाल पाटील म्हणाले, डॉ. पाटणकरांचे कोल्हापूरप्रमाणेच सांगलीमध्ये चांगले काम केले आहे. त्यांचा आटपाडीचा बंदीस्त पाईपलाईनचा पॅटर्न राज्यभर राबविला गेला आहे. त्यांनी येथून पुढेही कष्टकरी समाजासाठी लढा सुरूच ठेवावा. यावेळी संपत देसाई, अॅङ कृष्णा पाटील, गोपाळ गुरू, मनिषा गुप्ते, के. जे. जॉर्ज यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्ही.बी.पाटील, वसंतराव मुळीक, विजय देवणे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटणकरांकडून वंचितांना ताकद देण्याचे काम
आमदार ऋतूराज पाटील म्हणाले, डॉ. पाटणकर यांचे 75 वर्ष संघर्षमय प्रवास आहे. त्यांचे जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे युवकांना दिशा मिळेल. वंचिताना ताकद देण्याचे काम केले. त्यांनी दिलेला हा संदेश जपण्याचे काम सर्वांचे आहे.

रक्त आणि घाम मातीत मिसळला आहे
सत्काराला उत्तर देताना पाटणकर म्हणाले, घरच्याकडून मला संघर्षचा वारसा मिळाला. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच माझ्या चळवळीला सुरूवात झाली. 25 जणांचा ग्रुप समाजकार्यात होता. सर्वांनी मुक्त आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहीले. आमचे स्वप्न अजूनही मेले नाही. माझे रक्त आणि घाम या मातीत मिसळला आहे. मी देखील एक दिवस या मातीत मिसळेन त्यानंतर अंकुराप्रमाणे पुन्हा संघर्ष करण्यासठी उगवेन.‘

केवळ घरच हीच संपत्ती
पाटणकर म्हणाले, मी गेली 52 वर्षे चळवळीत आहे. आयुष्यात दुसरे काहीच केले नाही. वडलोपार्जीत घर सोडले तर माझ्याकडे दुसरे काहीच नाही. याचा मला अभिमान वाटतो.‘

हॉल हाऊसफुल्ल
भारत पाटणकरांच्या सत्कार करण्यासाठी कोल्हापूसह सांगली, सातारा येथूनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे सभागृह भरल्यावर बाहेर क्रिन लावण्यात आले होते. तेथेही गर्दी होती.

Advertisement
Tags :

.