For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

05:12 PM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा  शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या  शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Advertisement

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेती आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकरी आणि शेतमजुरांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Advertisement

पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या खरीप पिकांवर परिणाम होत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. काही भागांत पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भावही वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पवार यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी औपचारिक निकषांची प्रतीक्षा न करता पावसाचा तुटवडा असलेल्या तालुक्यांची तातडीने ओळख करून मदत सुरू करण्याची मागणी केली आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान 50 हजार रुपये आणि शेतमजुरांच्या प्रत्येक कुटुंबाला 25 हजार रुपयांची विशेष मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Advertisement

याशिवाय कर्जमाफी योजना लागू करणे, शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देणे, पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी, रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य, फळबागांसाठी टँकरची व्यवस्था, चारा छावण्या सुरू करणे आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी पवार यांनी केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, राज्य सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही संबंधित यंत्रणांना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.