Hasan Mushrif : काका-पुतणे एकत्र आले तर आम्हाला आनंदच, मुश्रीफांची सकारात्मक प्रतिक्रिया
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अडीच तास साखरपेरणी झाल्यानंतर चर्चांना उधाण
कोल्हापूर : सध्या राज्यात राज-उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांना पूर्णविराम मिळतो की नाही तोच शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठीकीच्या निमित्ताने काका-पुतणे एकत्र आले. दोघांत जवळपास अडीच तास साखरपेरणी झाल्याने राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चांना उधाण आले. यासंदर्भात आता वैद्यकीय मंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली.
शरद पवार आणि अजित पवार आधीपासूनच एकत्र आहेत, असं संजय राऊत म्हणत असतील तर आम्हाला फार मोठा आनंद होईल. यासाठी निश्चित दोघांनाही विनंती करु, असेही मुश्रीफ म्हणाले आहेत. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी वक्तव्य केले. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केले, त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आता पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येणार, अजित पवार नाराज आहेत का? अशा चर्चांना उधाण आले.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलेल्या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीसंदर्भात अजित पवार यांनी अजून कोणतीही कल्पना दिलेली नाही. अनेक मंडळांवर, समितींवर सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष असल्यामुळे बैठकींना उपस्थित रहावे लागते असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. शरद पवार आणि अजित पवार आधीपासून एकत्र आहेत या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, संजय राऊतांना जर शरद पवारांनी सांगितलं असेल तर आम्हाला फार मोठा आनंदच होईल. कारणं अनेक वर्ष आम्ही दोघांबरोबर काम केले. आम्ही त्यांच्या विचारांवर मोठे झालेले कार्यकर्ते आहोत.
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्रिकरणाची शक्यता फेटाळली असली तरी दोन पवारांमधील वाढत्या जवळकीने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. परिवार म्हणून एकत्र येणे ही महाराष्ट्राची परंपरा असल्याची बोलकी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. काल पुण्यातील साखर संकुलातील ही बैठक अडीच तास चालली. बैठकीला दोन नेत्यांसह काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते. काका-पुतणे एकमेकांच्या बाजूला बसून बातचित करत असल्याचे दिसल्याने राज्याचे राजकारण आता पुन्हा कोणते नवीन वळण घेणार का पहावे लागणार आहे.