शांतरसाचा पूर
अध्याय पाचवा
देहा-मनाने बुद्धीने इंद्रियांनी हि केवळ । आत्म-शुद्ध्यर्थ नि:संग योगी कर्म अनुष्ठिती ।। 11।। ह्या श्लोकाचा आपण अभ्यास करत आहोत, त्यानुसार कर्मयोगी देह, मन, बुद्धी आणि इंद्रियानी जी कर्मे करतो तो ती केवळ आत्मशुद्धीसाठी करत असल्याने त्याला त्यापासून फळाची अपेक्षा नसते. कोणतेही कर्म करायचे झाले की, कर्म सुरु करण्यापूर्वी मनात त्या कर्माचे विचार येतात आणि ते कसे पार पडावे ह्याबद्दल बुद्धी मार्गदर्शन करते परंतु काही वेळा कर्म बुद्धीला समजण्यापूर्वी व मनात त्यासंबंधी विचार येण्याच्या अगोदरच शरीराकडून केले जाते. अशा कर्मपूर्तीला कायिक कर्म असे म्हणतात. योगी ईश्वराशी एकरूप झालेले असल्याने त्याची इच्छा ही ईश्वराची इच्छा असते. त्या कशा पूर्ण करून घ्यायच्या हे ईश्वर ठरवतो पण ते करणारा योगी कर्माने बांधला जात नाही कारण त्याने कर्तेपणाच्या अहंकाराचा त्याग केलेला असतो. हे मानसिक कर्म होय.
एखाद्या माणसाच्या अंगात भूताचा संचार झाला की, त्याचे चित्त आपणच ते भूत आहोत ह्या गैरसमजुतीने इंद्रियांच्या हालचाली करत असते. त्याला समोरचा माणूस तर दिसत असतो, त्याला हाक मारलेलीही ऐकू येते. त्यास रूपही दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने बोलतही असतो परंतु हे सर्व केल्याची त्यास जाणीव नसते. हे वाचिक कर्म होय. कोणत्याही कारणाशिवाय मनुष्य जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज. सर्वकाही जाणण्याचे काम बुद्धीचे असते. त्यानुसार कर्मयोगी बुद्धीने सुचवल्यानुसार कायिक, मानसिक आणि इंद्रियांची कर्मे मन:पूर्वक करत असला तरी मुक्त असतो कारण त्याच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही अहंकाराचे स्मरणच नसते. अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच निष्कर्म होय. ही मर्माची गोष्ट आपल्याला सदगुरूंकडून कळते.
त्यासाठी चित्तशुद्धी होणे आवश्यक आहे. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात सद्गुरू सेवा पूर्ण होणे आणि चित्तशुद्धी होणे ह्या दोन्ही क्रिया एकदमच घडतात. सद्गुरूसेवा म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नव्हे तर त्यांच्या आज्ञेचे कोणत्याही परिस्थितीत तंतोतंत पालन करणे.
चित्तशुद्धी म्हणजे काय ते समजावून घेऊ. चित्त तत्वत: निर्जीव असते. ते सत्वगुणापासून तयार होत असल्याने त्यात सत्वगुणाचे प्रमाण अधिक असले तरी त्यात रज व तम गुण काही प्रमाणात असतातच. त्यामुळे चित्तात रजोगुणात्मक क्रोधादि वृत्ती किंवा तमोगुणात्मक आळस, निद्रा नांदत असतात. हीच चित्ताची अशुद्धी होय. श्रद्धेने केलेल्या सद्गुरूसेवेमुळे ह्या वृत्ती ज्या प्रमाणात क्षीण होत जातात त्या प्रमाणात चित्त शुद्ध होत जाते. चित्त पूर्णपणे शुद्ध झाले की आत्मा त्रिगुणांपेक्षा वेगळा आहे हे लक्षात येते.
पुढे माउली सांगतात की, खरे म्हणजे हे शब्दात मांडणे अवघड आहे परंतु मनुष्य जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा तो ह्या गोष्टी संगतवार सांगू शकतो. येथे तर शांतरसाचा पूर आलेला असून तो मर्यादा सोडून उचंबळत आहे. त्यामुळे बोलण्याच्या पलीकडील गोष्टी मला सांगता आल्या.
शांतरसाचा पूर कशाला म्हणता येईल ते समजावून घेऊ. चित्तशुद्धी झालेल्या माणसाला आपण कर्ते नाही अशी बालंबाल खात्री झालेली असते तो अंतर्यामी इतका शांत असतो की, शांती त्याच्या नसानसातून वाहून ओसंडून शरीराच्या बाहेर पडते की, काय असे वाटत असते. ह्याला शांतरसाचा पूर असे म्हणतात.
क्रमश: