शान मसूद दुसऱ्या कसोटीतून बाहेर
वृत्तसंस्था, इस्लामाबाद
पाकचा क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने पाकचा दणदणीत पराभव करत आघाडी घेतली आहे. पाक संघातील भरवशाचा फलंदाज शान मसूद दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही.
या मालिकेतील पहिल्या कसोटीत खेळताना शान मसूदच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती. या करंगळीचे हाड मोडल्याने त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाही, अशी माहिती पीसीबीच्या प्रवक्त्याने दिली आहे. शान मसूदकडे यापूर्वी पाकचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली पाक संघाला 16 पैकी 12 सामने गमवावे लागले. त्यामुळे विंडीज दौऱ्यापूर्वी पीसीबीने पाक कसोटी संघाचे नेतृत्व पुन्हा बाबर आझमकडे सोपविले आहे. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाला विदेशात सलग आठव्या पराभवाला टाळता आले नाही. या मालिकेतील पहिल्या कसोटीत विंडीजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सचा वेगवान चेंडू शान मसूरच्या डाव्या हाताच्या करंगळीवर आदळल्याने त्याच्या या करंगळीचे हाड मोडले होते. या कसोटी सामन्यात शान मसूदने आपले सातवे कसोटी शतक झळकविले होते. पण त्याला आपल्या संघाचा पराभव रोखता आला नाही.
दुसऱ्या कसोटीसाठी पाक संघात मसूदच्या जागी अब्दुल्ला शफीक, सौद शकील आणि नवोदित आवेश जाफर या पैकी एकाला संधी मिळू शकेल. उभय संघातील ही दुसरी कसोटी येत्या रविवारपासून खेळविली जाईल. तसेच विंडीजच्या दौऱ्यानंतर पाकचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 ऑगस्टपासून लीड्स येथे सुरू होईल. दरम्यान शान मसूद या दौऱ्यातील पहिल्या कसोटीत खेळणार किंवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.