शम्स मुलानीच्या 6 विकेट्स, ओडिशाला दिला फॉलोऑन
मुंबईची मोठ्या विजयाकडे वाटचाल : फॉलोऑननंतरही ओडिशाचा डाव घसरला
वृत्तसंस्था/ मुंबई
येथील शरद पवार क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत ओडिशाविरुद्ध लढतीत मुंबईची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरु आहे. मुंबईने पहिला डाव 602 धावांत घोषित केला. प्रत्युतरात शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीसमोर ओडिशाचा डाव 285 धावांत आटोपला. यानंतर मुंबईने ओडिशाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात खेळतानाही ओडिशाची घसरगुंडी उडाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ओडिशाने 5 गडी गमावत 126 धावा केल्या होत्या. अद्याप ओडिशाचा संघ 191 धावांनी पिछाडीवर असून सामन्याचा आजचा शेवटचा दिवस बाकी आहे.
प्रारंभी, श्रेयस अय्यरचे द्विशतक व सिद्धेश लाडचे दीडशतक यांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने आपला पहिला डाव 602 धावांवर घोषित केला. यानंतर ओडिशाच्या डावाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 5 गडी गमावत 146 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी तिसऱ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. संदीप पटनाईकने शानदार शतकी खेळी साकारताना 187 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारासह 102 धावा फटकावल्या. इतर ओडिशाचे फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. ओडिशाचा डाव 285 धावांत आटोपला व मुंबईला 317 धावांची मोठी आघाडी मिळाली. मुंबईकडून शम्स मुलानीने 6 तर हिमांशु सिंगने 3 विकेट्स घेतल्या.
फॉलोऑननंतरही ओडिशाची घसरगुंडी
पहिल्या डावात 317 धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने ओडिशाला फॉलोऑन दिला. फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात खेळताना ओडिशाची घसरगुंडी उडाली असून तिसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी 5 गडी गमावत 126 धावांपर्यंत मजल मारली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना 191 धावांची गरज आहे. दिवसअखेरीस आशिर्वाद स्वान 46 धावांवर खेळत होता. मुंबईकडून हिमांशूने 3 तर मुलानीने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव 4 बाद 602 घोषित
ओडिशा पहिला डाव 285 (संदीप पटनाईक 102, प्रधान 45, स्वान 37, मुलानी 6 बळी तर हिमांशु सिंग 3 बळी) व दुसरा डाव 5 बाद 126 (सारंगी 6, स्वस्तिक समल 1, स्वान नाबाद 46, संदीप पटनाईक 39, समंत्रय 26, हिमांशु सिंग 3 तर मुलानी 1 बळी).
इतर सामन्यांचे निकाल
बडोदा 235 व बिनबाद 37 वि त्रिपुरा 7 बाद 482 घोषित
पश्चिम बंगाल 301 व 3 बाद 127 वि कर्नाटक 221
उत्तर प्रदेश 162 व 2 बाद 66 वि केरळ 395
सेनादल 293 व 230 वि महाराष्ट्र 185 व 3 बाद 52
गोवा 9 बाद 555 घोषित वि मिझोराम 204 व 182, गोवा 1 डाव व 169 धावांनी विजयी.