For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजेंचे स्मारक उभारणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

02:23 PM Aug 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
रत्नागिरीत लोकनेते शामराव पेजेंचे स्मारक उभारणार  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
Advertisement

 जमिनीसह आवश्यक निधी उपलब्ध करून देणार; रत्नागिरीत सागरी विद्यापीठाच्या उभारणीस तत्वत: मान्यता; शासकीय विधी महाविद्यालय कामाचाही घेतला आढावा

रत्नागिरी प्रतिनिधी

कोकणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणारे कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्मारकासाठी जमिनी उपलब्ध करण्यासह आवश्यक निधी उपलब्ध कऊन देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत दिले. लोकनेते शामराव पेजे यांचे स्मारक भव्य आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे झाले पाहिजे, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. रत्नागिरी जिह्यात सागरी विद्यापीठाच्या उभारणीलाही यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली.

Advertisement

रत्नागिरी जिह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व्यवसाय विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, गृह (परिवहन व बंदरे) विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन शर्मा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रत्नागिरीतील संबंधित संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकण विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक कुवारबाव येथे व्हावे, ही रत्नागिरीकरांची आणि राज्य शासनाची इच्छा आहे. त्यादृष्टीने स्मारकासाठी आवश्यक जागा संबंधित विभागाने तातडीने हस्तांतरित करावी, स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध कऊन देण्यात येईल. स्मारकाचे काम दर्जेदार आणि लोकनेत्यास साजेसे असले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Advertisement

मेर्वी समुद्रकिनारी उभारणार सागरी विद्यापीठ
कोकणला लाभलेल्या सागरी किनाऱ्याचे महत्व लक्षात घेऊन रत्नागिरी जिह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यास बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. हे सागरी विद्यापीठ मेर्वी येथे समुद्रकिनारी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. रत्नागिरी येथे शासकीय विधी महाविद्यालय उभारण्यासह जिह्यातील अन्य प्रकल्प आणि विकासकामांचा सविस्तर आढावाही बैठकीत घेण्यात आला.

Advertisement
Tags :

.