शमीने वेधले निवड समितीचे लक्ष
वृत्तसंस्था / कोलकाता
2025 च्या रणजी स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या इलाईट गटातील सामन्यात बंगालने गुजरातचा मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी 141 धावांनी दणदणीत पराभव करत पूर्णगुण वसुल केले. या सामन्यात बंगालकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 38 धावांत 5 गडी बाद करुन आगामी द. आफ्रिका विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.
36 वर्षीय मोहम्मद शमीने या सामन्यात एकूण 8 गडी बाद केले. शमीने गुजरातच्या पहिल्या डावात 3 बळी मिळविले होते. गुजरात संघातील सलामीचा फलंदाज उर्वरिल पटेलने शानदार शतक (109) तर जैयमित पटेलने 45 धावांचे योगदान दिले. मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी गुजरातचा दुसरा डाव 185 धावांत आटोपला. मोहम्मद शमीने यापूर्वी झालेल्या उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात 7 गडी बाद केले होते. चालु वर्षीच्या रणजी हंगामात त्याने दोन सामन्यातून 15 बळी मिळविले आहेत. या कामगिरीने भारतीय क्रिकेट निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.