For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

शेवटी वचपा काढलाच! सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाईंचा विजय; ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये यश, भाजपला मोठा धक्का

10:17 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेवटी वचपा काढलाच  सातारा जिल्हा बँकेत शंभूराज देसाईंचा विजय  ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये यश  भाजपला मोठा धक्का
Advertisement
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्याशी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत देसाई यांनी बाजी मारली. तब्बल ४२ वर्षांनंतर पाटणमध्ये देसाई गटाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यश मिळवल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हा बँकेच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्याच तासात पाटण सोसायटी मतदारसंघाचा निकाल समोर आला. या निवडणुकीत एकूण १०३ ठरावांपैकी ५८ ठराव देसाई यांच्या बाजूने झाल्याने त्यांची सरशी निश्चित झाली. या विजयामुळे भाजपच्या सत्यजितसिंह पाटणकर गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

पाटणमधील राजकीय संघर्षाला नवे वळण

पाटणमध्ये शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकर यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने ही लढत अत्यंत चुरशीची बनली होती. अखेर ठरावांच्या संख्याबळावर देसाई यांनी विजय मिळवत पाटणमधील आपले राजकीय वर्चस्व अधिक मजबूत केले.

Advertisement

यशराज देसाईंची महत्त्वपूर्ण भूमिका

या विजयामागे शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. ठरावांचे नियोजन आणि मतदारांशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे देसाई गटाच्या विजयात त्यांच्या योगदानाकडेही लक्ष वेधले जात आहे.

सहकार क्षेत्रातील वर्चस्व वाढणार

पाटण सोसायटी मतदारसंघातील या विजयामुळे सातारा जिल्हा बँकेतील शंभूराज देसाई गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि सहकारी संस्थांमधील राजकीय समीकरणांवरही या निकालाचा परिणाम होऊ शकतो.

Advertisement

दरम्यान, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणूक निकालांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. साताऱ्यातील पाटणचा निकाल हा या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा राजकीय संकेत मानला जात आहे.

Advertisement
Tags :

.