Shaktipeeth Mahamarg: सुपारी घेऊन 'शक्तिपीठ'ला पाठिंबा, आता आरपार लढाईचा निर्धार
पुढील टप्प्यात आंदोलनाचा निर्णय झाला नाही
कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांची शक्तिपीठ महामार्गात वडिलोपार्जित जमीन जात नसल्यानेच त्यांना त्याची झळ नाही. परंतू ते कोणाच्या तरी हितासाठी सुपारी घेऊन बाधित शेतकऱ्यांना आणि कोल्हापूरला देशोधडीला लावू पाहत आहेत, असा गंभीर आरोप सोमवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्वच प्रमुख वक्त्यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गास विरोध आणि अलमट्टी धरणाची उंचीवाढी विरोधात आंदोलानची पुढील दिशा ठरवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या अंजिक्यतारा कार्यालयात इंडिया आघाडीची बैठक झाली. पुढील टप्प्यात आंदोलनाचा निर्णय झाला नाही. मात्र यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाला घेतलेल्या पाठिंब्याच्या भूमिकेवरुन वक्त्यांनी टीकेची राळ उठवली.
तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आता रस्त्यावर आरपारची लढाई लढण्याचा निर्धारही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गासंदर्भात सरकारकडे हजारो शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या आहेत. असे असताना आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराचे प्रश्न न सोडविता, शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका चुकीची आहे.
त्याचबरोबर त्यांनी या महामार्गात ज्या शेतकऱ्यांची शेती जाते. त्या शेतकऱ्यांनी या महामार्गाला समर्थक असल्याचे म्हटले आहे. त्या समर्थक शेतकऱ्यांच्या नावाची यादी प्रसिध्द करावी, असे आवाहन केले.शिवसेनेचे संजय पवार यांनी, आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरच्या विकासासाठी काय केले असा सवाल केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांनी सरकारची सुपारी घेऊन शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याचा आरोप केला. विकासाच्या नावाखाली लूट करणाऱ्यांची टोळी एकत्रित आली असून, या टोळीकडून शक्तिपीठ महामार्ग जिह्यातील शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट घातल्याचे ते म्हणाले.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रा. उदय नारकर, कॉ. अतुल दिघे, माजी नगरसेविका भारती पोवार, हसन देसाई, बाबासाहेब देवकर, कॉ. दिलीप पवार कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, अनिल घाटगे, आदींची भाषणे झाली.
यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, माजी उपमहापौर सुलाचना नायकवडी, राजेश लाटकर, बाबुराव कदम, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, व्यंकाप्पा भोसले आदी उपस्थित होते.
शाहू छत्रपती आणि सतेज पाटील यांनी आवाज उठवावाशिवसेनेचे संजय पवार म्हणाले, कावळा नाका येथील सरकारी जमीनीसह इतर ठिकाणच्या सरकारी जमिनी बळकावल्या आहेत. आमदार क्षीरसागर यांच्या पाठबळावर झालेल्या या कारनाम्याविरोधात खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात आवाज उठवावा, अशी मागणी केली.
पावसाळी अधिवेशन संपताच मेळावाशक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर शहर धोक्यात येणार आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी इंडिया आघाडीकडून शहरातील 32 प्रभागांतील नागरिकांचा राज्याचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली.