महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी रस्त्यावर; दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

04:14 PM Jun 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
Shaktipeeth highway Morcha
Advertisement

महामार्ग रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; हजारो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी; शक्तीपीठचा निर्णय रद्द होईपर्यंत मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी

नागपूर ते गोवापर्यंत प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिह्यातील हजारो शेतकरी मंगळवारी रस्त्यावर उतरले. महामार्ग करण्याचा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी केला. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत मंत्र्यांना जिल्हा बंदी करू. प्रसंगी महामार्ग रोखू असा इशाराही यावेळी देण्यात आला. दसरा चौकातून विराट मोर्चास सुरुवात झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे भव्य सभेत रूपांतर झाले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करून आपण शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले. पण शासनाकडून शेतकऱ्यांमध्ये दोन भाग पाडण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनीही एकजूट ठेवावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

Advertisement

दसरा चौक मैदानावरून दुपारी बारा वाजता मोर्चास सुरुवात झाली. दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीज मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. हातामध्ये लक्षवेधी फलक घेऊन भांडवलदार सरकार मुर्दाबाद, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, जमीन आमच्या हक्काची...नाही कोणाच्या बापाची, शेती वाचवा...देश वाचवा, एकच जिद्द...शक्तीपीठ महामार्ग रद्द’ अशा विविध घोषणा देत हजारो शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ‘शेती वाचवा, देश वाचवा’ असा मजकूर लिहीलेल्या टोप्या शेतकऱ्यांनी परिधान केल्या होत्या.

Advertisement

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. या यामध्ये खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संघर्ष समितीचे समन्यवक गिरीश फोंडे, कॉम्रेड भारत पाटणकर, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवानंद माळी, राहुल आवाडे, अंबरिश घाटगे, प्रसाद खोबरे, बाबासाहेब देवकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले प्रकाश चौगुले, करणसिंह गायकवाड, गोकुळचे माजी संचालक रामराजे कुपेकर, कॉम्रेड उदय नारकर यांच्यासह जिह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर अनेक नेत्यांची भाषणे झाले. कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग जर शेतकऱ्यांच्या माथी मारला जात असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे डिपॉजिट जप्त करू असा इशारा यावेळी देण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चात युवराज संभाजीराजे छत्रपती सामील झाले होते. तर शाहू ग्रुपचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनीही मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दिला. गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, किसान संघाचे भगवान काटे यांनीही आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली भूमिका स्पष्ट करताना गिरीश फोंडे म्हणाले, शक्तीपीठ महामार्ग हा केवळ कंत्राटदारांच्या हिताचा असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा महामार्ग रद्द केला नाही तर मंत्र्यांना कोल्हापुर बंदी घातली जाईल. कॉम्रड संपत देसाई म्हणाले, शक्तीपीठ हे नाव देण्यामध्ये सांस्कृतिक राजकारण आहे. महामार्गाविरोधात हा इशारा मोर्चा आहे. राज्यसरकारने येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. हा मार्ग ज्या भागातून जाणार आहे, त्यामधील बराचसा भाग हा ‘इको सेन्सिटिव्ह’ आहे. त्यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान होणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाचे नेते शक्तीपीठ मार्ग रद्द होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत. पण त्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली जात असेल तर त्यांनी आपल्या आमदार आणि मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या लढ्यास पाठींबा द्यावा अशी मागणी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केली.

विजय देवणे म्हणाले, जिह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लवकरच जागे होऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा कागलची जनता त्यांच्या राजकारणावर बुलडोजर फिरवल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील 12 जिह्यातील शेतकरी या महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील प्रत्येक निर्णय नरेंद्र मोदी निर्णय घेतात व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते वाचून दाखवतात अशी स्थिती आहे. त्यामुळे हा लढा ज्या पद्धतीने जिल्हा पातळीवर सुरु आहे, त्याच पद्धतीने राज्य आणि केंद्र पातळीवर देखील सुरु ठेवणे आवश्यक आहे.

महामार्ग रद्दची नव्हे तर त्याची दिशा बदलण्याची मागणी
माजी आमदार के.पी.पाटील म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील 28 गावांतून हा महामार्ग जातो. हा महामार्ग मंजूर झाल्यानंतर तो मीच केला अशा आशयाचे मोठे पोस्टर आमदारांनी गारगोटीत लावले होते. या मार्गासाठी आमदार आबिटकर यांनी प्रयत्न केले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभेच्या प्रचारादरम्यान सांगितले होते. त्यामुळे आता त्यांनी महामार्ग रद्द करावा म्हणून निवेदन दिले नसून केवळ त्याची दिशा बदलावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा मार्ग रद्द करण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत आवाज उठवण्याची गरज आहे.

लोकसभेत ट्रेलर पहिलाय, आगामी निवडणुकीत पिक्चर
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग बारा जिह्यातून जातो. पण नागपूरपासून कोल्हापूरला यायच असेल, सोलापूरला अथवा नांदेडला जायचे असेल तर त्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. त्यामुळे या महामार्गाची गरज काय ? त्यामुळे सरकारने हा मार्ग रद्द करावा. अन्यथा लोकसभा निवडणुकीत त्यांनी ट्रेलर पाहिला आहे, आता आगामी निवडणुकीत सर्वसामान्य जनता त्यांना पिक्चर दाखविल्याशिवाय राहणार नाही.

शेती संपादानाचे नोटिफिकेशन कायद्याच्या विरोधात
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, महामार्गासाठी शेती संपदानाचे जे नोटिफिकेशन निघाले आहे, ते कायद्याच्या 100 टक्के विरोधात आहे. या नोटिफिकेशनमधून केंद्र सरकारचा कायदा मोडला जाणार आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे जमीन मोजणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करा.

खेबवडेतील बैलगाडीने वेधले लक्ष
शक्तीपीठ विरोधातील मोर्चात खेबवडेतील शेतकरी बैलगाडी घेवून सहभागी झाला होता. या बैलगाडीच्या बैलाच्या पाठीवर जी झुल घातली होती. त्या झुलीवरील ‘शेती वाजवा देश वाचवा, कंत्राटदार व मंत्र्याचे खिसे भरणारा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. हा आशय उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेत होता.

शेतकरी एकजुटीचा विजय असो
शक्तीपीठ महामार्ग जिह्यातील शिरोळ, हातकणगंले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यातून जातो. त्यामुळे हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आयोजित मोर्चात या सहा तालुक्यातील शेतकरी आपल्या कुटूंबासह उस्फुर्तपणे मोर्चात सहभागी झाले होतो. यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो, महाराष्ट्र सरकार कोमात कंत्राटदार जोमात. शेती आमच्या हाकाची नाही कोणाच्या बापाची अशी घोषवाक्य असलेले फलक हातात घेवून सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
kolhapur newsSATEJ PATILShaktipeeth highwayussehra Chowk to Collector OfficeVirat Morcha
Next Article