शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
व्हनाळी येथील बैठकीत शेतकऱ्यांचा संतप्त सवाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
व्हनाळी वार्ताहर
मुळात गोव्याला जाण्यासाठी कागल हून आजरा- आंबोली मार्गे सुरक्षित चांगला मार्ग आधीच असताना शक्तीपीठाच्या नावाखाली नागपूर - गोवा हा नवीन महामार्ग कशासाठी ? असा संत्पत प्रश्न येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. कारण हा मार्ग शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून अनेक शेतकरी यामुळे विस्थापित होणार असून अगोदरच आसमानी संकटांनी आधीच मेटा कुठीला आलेल्या शेतकऱ्यांवर हा वरवंटाच आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांना भूमीहीन करणाऱ्या या मार्गाला आमचा कायमपणे तीव्र विरोधच राहणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
नागपूर - गोवा शक्तिपीठ महामार्ग रोखण्यासाठी व्हनाळी ता. कागल येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय येथे सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक पार पडली.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग झाल्यास या परिसरातील शेकडो एकर जमीन जाणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असून आधीच मेटाकोटीला आलेले शेतकरी भूमीन होणार आहेत शिवाय शिल्लक जमीनही या मार्गामुळे गेल्याने शेतक-यांच्या पुढील पिढीचेही मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा मार्ग रद्द होण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतक-यांसह प्रसंगी आपण लढा उभारू असेही ते म्हणाले.
राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी पाटील म्हणाले, कागल निढोरी राज्य मार्ग, दूधगंगा उजवा कॅनॉल यासाठी आधीच शेकडो एकर जमीन येथील शेतकऱ्यांची गेली आहे तर पंचक्रोशीतील अनेक जमिनी सुद्धा आता या नवीन शक्तिपीठ मार्गासाठी जाणार आहेत हा शक्तिपीठ मार्ग रद्द व्हावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जमीन आमच्या हक्काची.... नाही कुणाच्या बापाची.... शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे.... शक्तीपीठ मार्ग थांबलाच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी संतप्त शेतक-यांनी दिल्या. या बैठकीला बामणी सिद्धनेर्ली, एकोंडी , व्हनाळी आदी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.