For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुकेरीत शक्तीपीठ महामार्गाबाबत भूसंपादन सुनावणी दुसऱ्यांदा रद्द; प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त

फुकेरीत शक्तीपीठ महामार्गाबाबत भूसंपादन सुनावणी दुसऱ्यांदा रद्द  प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त
Advertisement

ओटवणे : शक्तीपीठ द्रुतगती मार्गाबाबत फुकेरीवासीयांनी घेतलेल्या हरकतींवर महसूल प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेली भूसंपादन सुनावणी दुसऱ्यांदा अचानक रद्द करण्यात आली. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी नियोजित केलेली सुनावणीही अचानक रद्द झाल्याने फुकेरी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

आता ही भूसंपादन सुनावणी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता ग्रामदैवत ग्रामदेव माऊली मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.

दुसऱ्यांदा सुनावणी रद्द

यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी भूसंपादन सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोणतेही स्पष्ट कारण न देता ‘अपरिहार्य कारणास्तव’ सुनावणी रद्द करण्यात आल्याचे पत्र हरकतदार ग्रामस्थांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आले होते. त्यावेळीही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.

Advertisement

त्यानंतर ही सुनावणी 25 ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र यावेळीही भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे हे विशेष सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या बैठकीसाठी व्यस्त असल्याचे कारण देत सुनावणी पुन्हा रद्द करण्यात आली. याबाबतचे पत्रही हरकतदार ग्रामस्थांना व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात आले.

नियोजनशून्य कारभाराबाबत संताप

सलग 2 वेळा भूसंपादन सुनावणी अचानक रद्द करण्यात आल्याने भूसंपादन विभागाच्या नियोजनशून्य कारभाराबाबत फुकेरी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता सुनावणी घ्यायची असेल, तर शक्तीपीठ महामार्गाबाबतची संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर ठेवावी. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या हरकती व मागण्यांवर ठोस कार्यवाही करूनच सुनावणी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून, यावेळी तरी सुनावणी सुरळीतपणे पार पडते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisement
Tags :

.