Cyclone Shakti Konkan : कोकण किनारपट्टीला वादळाचा जोरदार फटका, घरांचे लाखोंचे नुकसान
महसूलकडून नुकसानीचे वेगाने पंचनामे सुरू
दापोली, गुहागर : तालुक्यातील आडे-पाडले, आंजर्ले, हर्णै समुद्रालगत असलेल्या गांवामध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या काही मिनिटांच्या वादळी वाऱ्यांमुळे घरांचे, गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीचे महसूलकडून वेगाने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, गुहागर तालुक्यातही बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा त्रिशूळसाखरीला मोठा फटका बसला. तालुक्यात विविध ठिकाणी घरांवरील पत्रे उडणे, वीजखांब कोसळणे, झाडे पडणे अशा घटना घडल्याने मोठे नुकसान झाले. आठ दिवसांपासून समुद्रकिनाऱ्यांवर 50 ते 60 प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून दिले जात होते.
बुधवारी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वारे वाहू लागले. काही मिनिटांच्या या वाऱ्यांनी घरांचे, पत्रे, कौले उडाली. झाडे वाहनांवर पडून नुकसान झाले. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे काही प्रमाणात नुकसान झाले असून अधिक फटका आडे-पाडले ग्रामस्थांना बसला. प्रशासकीय यंत्रणेने रस्त्यांवर पडलेली झाडे बाजूला करुन रस्ता मोकळा करण्यात आला.
पाडले येथील जितेंद्र मयेकर, नंदकुमार लिमये, प्रसन्नकुमार लिमये, स्वदेश लिमये, शशिकांत लिमये, प्रसाद लिमये, कौस्तुभ, लिमये, दत्तात्रय हुमणे, अमित दांडेकर, अंकेश जोशी, योगेश लिमये तर आडे येथील अजित बेहेरे यांच्या घरांचे सुमारे 20 लाख रुपयांचे, हर्णै येथील डॉ. अंतुले यांच्या घराचे 25 हजार, रोहन पिंपळे यांच्या घराचे व गाडीचे 40 हजार, लक्ष्मण पाटील यांच्या घराचे 20 हजार, वैशाली पाटील यांच्या घराचे 30 हजारांचे रुपयांचे नुकसान झाले. हरिदास पाटील, दिनेश कालेकर यांच्या घरांचेही नुकसान झाले. हर्णैतील वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानींचे पंचनामे महसूलकडून करण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळाची आठवण
काही मिनिटांसाठी झालेल्या या वादळी वाऱ्यांमुळे 2 ते 3 वर्षांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाची आठवण झाली. शक्ती चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, असे समाज माध्यमांवर वृत्त येत होते. त्यामुळे आधीच समुद्रालगतच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते.
50 ते 60 कि.मी. प्रतितास वेगवान वारे वाहणार असल्याचे संदेश हवामान विभागाकडून येत होते. त्यामुळे वाऱ्यांचा वेग नुकसान करणारा नसेल, असे वाटत होते. परंतु बुधवारी झालेल्या या वादळी वाऱ्यांनी काही मिनिटांसाठी काळजाचा ठोका चुकवल्याचे आडे पाडले, हर्णै, आंजर्लेतील ग्रामस्थांनी सांगितले.
गुहागरात विविध ठिकाणी झाडे पडून नुकसान
गुहागर तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळाचा त्रिशूळसाखरी गावाला फटका बसला. विविध ठिकाणी घरांवरील पत्रे उडणे, वीजखांब कोसळणे, झाडे पडणे अशा घटनांमध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही.
तालुक्यातील मौजे साखरीत्रिशूळ खेम झोलाई मंदिर येथील आंब्याचे झाड मुळासकट उपटून पडले. साखरीत्रिशूळ गवळवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. येथील मंगेश हरिश्चंद्र माटल यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडाले. साखरीत्रिशूळ येथील सुलोचना शंकर शिगवण, अंजनवेल काताळवाडी येथील रवींद्र बने, वरचापाट येथील सूर्यकांत सीताराम तवसाळकर व वेलदूर येथे अनंत पोपळे यांच्या घरांवर झाडे पडून नुकसान झाले.
जांभारी येथील रमाकांत सखाराम निमकर घराचे व मौजे वेळंब येथे संतोष शिवराम जाधव यांच्या मालकीच्या गोठ्याचे नुकसान झाले. शृंगारतळी कौंढरफाटा येथे वीजखांब पडला असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. आरे-वाकी पिंपळवट गावांमध्ये वीजखांब पडले असून 5 दिवस झाले तरी वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. पाटपन्हाळे हद्दीतील शृंगारतळी येथील हुसेन युनुस मुल्लाजी यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत.