For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Political News: शाहूवाडीत पडद्यामागील हालचालींना वेग, राजकीय गोळाबेरीज कशी तरी आहे?

01:06 PM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
political news  शाहूवाडीत पडद्यामागील हालचालींना वेग  राजकीय गोळाबेरीज कशी तरी आहे
Advertisement

इच्छुकांनी आपली अंतर्गत बांधणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसते

Advertisement

By : संतोष कुंभार

शाहूवाडी : जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या अनुषंगाने स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेत प्रमुख नेते मंडळींनी पडद्यामागच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. तर इच्छुकांनी देखील आपली अंतर्गत बांधणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे.

Advertisement

शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ गणात यावेळी रस्सीखेच पहायला मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्यात. त्यामुळे राजकीय पक्ष बंधनापेक्षा राजकीय गटच कसा प्रभावशाली ठरेल, या माध्यमातून आतापासून चाचपणी सुरू झाली आहे.

विद्यमान आमदार विनय कोरे, गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील- पेरीडकर एका बाजूला आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, उदय साखरचे चेअरमन मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंह गायकवाड आहेत. त्यांच्यातील राजकीय लढती यावेळी देखील चांगल्याच लक्षवेधी होणार असल्याचे सुतोवाच मिळत आहेत.

नव्या राजकीय घडामोडी फलदायी ठरणार?

राजकीय पातळीवर नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत, याचे पडसाद जिल्हास्तरीय सहकार संस्थेत दिसून आले आहेत. या सहकारी संस्थेत शाहूवाडी तालुक्यातील देखील दोन्ही गटाचे कार्यकर्ते सत्तेच्या माध्यमातून जिह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत.

यामध्ये गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून कर्णसिंह गायकवाड, जिल्हा बँकेत रणवीरसिंह गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नुकतेच उपसभापती म्हणून निवड झालेले राजाराम चव्हाण, शेतकरी संघात असलेले सुभाष जामदार यामुळे जिह्याच्या राजकारणात दोन्ही गटाचे प्रतिनिधी सत्तेत आहेत. मात्र जिह्याच्या राजकीय पटलावर जरी नवी समीकरणे घडली तरी मात्र तालुक्यात दोन पारंपरिक गटातील लढतीच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे देखील स्पष्ट होत आहे.

एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला काही महिन्यांचा अवधी असला तरी धो धो बरसणाऱ्या पावसात सुद्धा राजकीय हवा गरमच कशी राहील, याकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष दिले आहे. यामुळे विविध कारणांनी, विविध माध्यमातून स्थानिक पातळीवर संपर्क यंत्रणा गतिमान करण्याची सर्वच घटकांनी कमी अधिक प्रमाणात सुरुवात केली आहे.

त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागच्या हालचाली हळूहळू सुरू झाल्या आहेत. मात्र, खरी रणधुमाळी निवडणूक जाहीर झाल्यानंतर होणार असली तरी तोपर्यंत राजकीय वातावरण गरमच राहणार असल्याचे दिसू लागल आहे .

राजकीय गोळाबेरीज

तालुक्याच्या राजकारणात प्रमुख राजकीय पक्ष आणि गटाचे नेत्यांनी आपले नेतृत्व सिद्ध करत राजकीय प्रभाव कायमच ठेवला आहे. मात्र, स्थानिक पातळीवर असलेले विविध राजकीय गट याशिवाय अन्य मित्र पक्षांची देखील यामध्ये भूमिका निर्णायक ठरणार आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष ,दलित महासंघ यासह अन्य संघटना देखील या वेळच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार की काय अशी चर्चा सुरू आहे.

बहुतांश ठिकाणी नवीन चेहरे पुढे येण्याचे संकेत

निवडणुकीच्या रणधुमाळीला जरी काही दिवसाचा अवधी असला तरी अंतर्गत का होईना इच्छुकांनी आपली संपर्क यंत्रणा गतिमान करण्यास सुरुवात केली आहे. नेतेमंडळी पुन्हा आपणाला संधी देणार की नवा चेहरा पुढे आणणार, याचा देखील अंदाज बांधत इच्छुकांनी त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे या वेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुतांश ठिकाणी नवीन चेहरे पुढे येण्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्यामुळे नेते मंडळी आपली राजकीय मोर्चेबांधणी कशी करणार आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याचा देखील आढावा सुरू आहे. मात्र, या वेळच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घुमशान होणार आहे.

Advertisement
Tags :

.