शाहुवाडी- पन्हाळा तालुक्यात १७ ग्रामपंचायतीवर जनसुराज्य शक्तीसह संयुक्त आघाडीची सत्ता
जनसुराज्यचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील यांचा दावा
वारणानगर / प्रतिनिधी
शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या नेतृत्वाखाली १७ ग्रामपंचायतीवर जनसुराज्य शक्ती पक्षासह संयुक्त आघाडीने सत्ता मिळवली असून सर्व ठिकाणी लोकनियुक्त सरपंचपदी वर्णी लागल्याचा दावा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आज सोमवार दि.६ रोजी शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि विजेत्या लोकनियुक्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पन्हाळ्यातील माजगांव पैकी शिंदेवाडी, माजगांव पैकी खोतवाडी, माजगांव पैकी माळवाडी, माजगाव पैकी देवठाणे, कसबा ठाणे, महाडिकवाडी, बाजार भोगाव, काटे भोगाव, सुळे, कोदवडे, वेखंडवाडी, बादेवाडी, बोरिवडे, वाळवेकरवाडी या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनसुराज्यचे लोकनियुक्त सरपंच १०, विरोधी गटाकडे ३, आघाडीकडे १ व अपक्ष १ असे सरपंच झाले आहेत.या १५ ग्रामपंचायतीच्या ११३ सदस्यांपैकी पैकी ७७ ठिकाणी जनसुराज्यचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले संयुक्त १६ ग्रामपंचायत सदस्य तर विरोधी गटाचे २० सदस्य विजयी झाले आहेत. आघाडीचे सरपंच १, अपक्ष १ तर विरोधी गटाकडे ३ सरपंचपदे मिळाली आहेत.
शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, सावर्डे खुर्द, शेंबवणे, गेळवडे, सुपात्रे, कासार्डे, सावे, माण, ऐनवाडी, वालूर या
१० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन जनसुराज्यचे ७ ठिकाणी सरपंचपदावर वर्णी लागली आहे तसेच ८१ सदस्यांपैकी ५३ सदस्य जनसुराज्य शक्तीचे विजयी झालेत. विरोधी गटाचे २ ठिकाणी सरपंच तर अपक्ष एका गावात, तर विरोधी गटाचे एकूण २८ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले आहेत. शिरगांव येथे फक्त एका ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणूक झाली त्यामध्येही जनसुराज्य शक्ती पक्षाला यश मिळाले असल्याचे प्रवक्ते अँड राजेंद्र पाटील यानी सांगितले.