Satara News: शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कामकाज स्वत:च्या इमारतीत
फर्निचरचे काम येत्या दोन आठवड्यात होणार पूर्ण
सातारा: नवीन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फर्निचर करण्यात येत असून येत्या दोन आठवड्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली. यामुळे लवकर पोलीस ठाण्याचे कामकाज स्वत:च्या इमारतीत होणार आहे.
सातारा शहर व तालुका पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून शाहूपुरी पोलीस ठाणे हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. यामुळे अनेक अडचणींचा सामना पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.
याच पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलीस ठाण्याला स्वत:ची इमारत मिळावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्या मागणीनुसार पोलीस अधिकाऱ्यांनी कागदपत्रे सादर करताच निधी उपलब्ध झाला. या निधीतून बुधवार नाका परिसरात इमारत बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे.
आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. फर्निचर करण्यात येत आहे. हे फर्निचरचे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी सांगितले. त्यानंतर इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरवला जाईल. आणि उद्घाटनानंतर या नवीन इमारतीत पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होणार आहे.