Satara News | साताऱ्यात गॅरेज मालकावर कोयता हल्ला करणाऱ्या आरोपींची शाहूपुरी पोलिसांकडून धिंड
साताऱ्यात कोयता गॅंगविरोधात पोलिसांची धडक कारवाई
सातारा - शहरातील मोळाचा ओढा परिसरात गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा आरोपींची शाहूपुरी पोलीसांनी मोळाचा ओढा,करंजे नाका परिसरातून पायी धिंड काढली. या कारवाईमुळे कोयता गॅंगवर पोलिसांनी वचक बसवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.मोळाचा ओढा, बुधवार नाका आणि करंजे परिसरातून सर्व आरोपींना तपासासाठी पायी फिरवण्यात आले.ज्या ठिकाणी हल्ला केला,जिथे कट रचला त्या ठिकाणी पोलिसांनी सर्व आरोपींना रस्त्याने पायी चालत नेत तपास केला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.काही दिवसांपूर्वी संबंधित आरोपींनी फिर्यादीच्या नातलगांकडून जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन गॅरेज मालकावर कोयत्याने हल्ला केला होता.त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत सहा आरोपींना अटक केली आहे.यामध्ये तीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शहरात वाढत चाललेल्या कोयता गॅंगच्या दहशतीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.या अप्रत्यक्ष धिंडीमुळे परिसरात नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.