चालू हंगामासाठी शाहू देणार प्रतिटन ३२०० रुपये
एफआरपीपेक्षा १०० रुपये देणार ज्यादा
कागल प्रतिनिधी
कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने सन २०२३ - २०२४ या चालू गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एक रकमी एफआरपी रुपये 3100 यापूर्वी जाहीर केली आहे .सद्यस्थितीत त्यामध्ये प्रति टन रुपये १०० रुपयांची वाढ करून चालू २०२३ - २४ या गळीत हंगामामध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी प्रति टन ३२०० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळांने घेतला आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, मागील गळीत हंगामासाठी शाहू कारखान्याने प्रतिटन ३ हजार रुपये दिले आहेत . शासन, शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यात काल झालेल्या समन्वय तोडग्यानुसार गेल्या वर्षीच्या उसासाठी प्रोत्सानात्मक ऊस दर प्रतिटन ५० रुपये देणार असून सदरची रक्कम राज्य शासनाकडून या संदर्भातील रीतसर परवानगी मिळाल्यानंतर व कारखान्याच्या निधी उपलब्धतेनुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देत आहोत.
चालू गळीत हंगामाचा कालावधी फारच कमी असल्याने सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही घाटगे यांनी यावेळी केले .