शाहू समाधीस्थळास निधी कमी पडू देणार नाही
सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, समाधीस्थळाची पाहणी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर
राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर काम केले. शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मी माझ्या कामाला कोल्हापूर नगरीत सुरुवात करीत आहे. समाधीस्थळाला आणखीन निधीची आवश्यकता असल्यास याचा प्रस्ताव द्या निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी रविवारी सकाळी त्यांनी नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले. पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील उपस्थित होते.
मिसाळ यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून समाधीस्थळाच्या कामाची माहिती घेतली. पहिल्या टप्प्यात कोणकोणती कामे झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे प्रस्तावित आहेत, याची सविस्तर माहिती मिसाळ यांनी घेतली. पहिल्या टप्प्यातील काम महापालिकेने चांगले केले. कोल्हापूर ही ऐतिहासिक व कलानगरी आहे. समाज कल्याणासाठी काम करणाऱ्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मी माझ्या कामाला कोल्हापूर नगरीत सुरुवात करीत आहे. कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाधीस्थळासाठी आणखीन निधीची आवश्यकता असल्यास याचे प्रस्ताव तयार करुन द्या समाजलकल्याण विभाग आपल्याकडेच आहे, निधीची कमतरता येवू देणार नाही असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, समाज कल्याण अधिकारी सचिन साळे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे उपस्थित होते.