Shahu Maharaj Shetkari Sanstha: शाहूंनी स्थापन केलेली शेतकी संस्था कोणती?
या संस्थेसाठी करवीर संस्थानातून देणगी गोळा करण्यात आली
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : करवीर संस्थानातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी एडवर्ड शेतकी संस्था स्थापन केली. या माध्यमातून संस्थानातील शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या शेतकी संस्थेचा सन 1914 मधील पहिला अहवाल मिळाला असून त्यातून शाहू महाराजांची शेतकऱ्यांविषयी असलेली कळकळ निदर्शनास येते.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळे प्रयोग राबवले. आधुनिक शेतीचे प्रयोग सुरू केले. चहासारखी अन्य पिके लागवड करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी आधुनिक साधने वापरून पिकांच्या उत्पन्न वाढीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी त्यांचे प्रयत्न होते.
त्यासाठी विविध उपाययोजना केल्या शाहू महाराजांच्या पुढाकाराने 1910 मध्ये कर्नल वुड हारुस यांच्या अध्यक्षतेखाली टाऊन हॉलमध्ये सभा भरून बादशहा एडवर्ड शेतकी संस्था स्थापन झाली. 12ऑक्टोबर 1912 रोजी संस्थेस मंजुरी मिळून त्याचे काम कामकाज सुरू झाले. रावबहादूर रघुनाथ सबनीस अध्यक्ष तर अण्णासाहेब लठठे सेक्रेटरी होते.
या संस्थेसाठी करवीर संस्थानातून देणगी गोळा करण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांनी दरवर्षी एक हजार रुपये देण्याची घोषणा केली. या संस्थेमार्फत संस्थानात शेती सुधारण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवण्यात आले. त्यापैकी पहिला प्रयोग म्हणजे पारंपरिक औताऐवजी लोखंडी नांगर व अन्य आधुनिक शेती साधने यांचा वापर.
पूर्वी लाकडी नांगर असे. त्याऐवजी शेतकी संस्थेने वेगवेगळ्या कंपन्यांचे लोखंडी नांगर विकत घेऊन तो प्रारंभी गडहिंग्लज पेट्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास दिला. शिरोळ व कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांनाही हे नांगर देण्यात आले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. तण काढण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा राखून ठेवण्यासाठी चार चाकी आणि दोन चाकी हात कोळपे यांचाही प्रयोग करण्यात आला.
कडबा कापण्याचे यंत्रही शेतकऱ्यांना पुरवण्यात येऊन त्यांचे श्रम कमी करण्यात आले. मका सोलण्याचे यंत्र देऊन मका काढणी जलद बनवण्यात आली. करवीर संस्थान हे गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे गूळ उत्पादनाच्या वाढीसाठी या संस्थेने विशेष प्रयत्न केल्याचे दिसतात.
गूळ तयार करण्यासाठी पारंपारिक चुलाण न वापरता पुणे चालीचे सिंगल आणि डबल चुलाण संस्थेमार्फत काही शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आले. या चुलाणामुळे जळणाची बचत झाली. शिवाय विस्तवाच्या झळीचा त्रास कमी झाला.
रुंद कायलीमुळे गुळाचा चिकटपणा कमी झाला, असे अभिप्राय असे चुलाण वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी या शेतकी संस्थेच्या अहवालात दिले आहेत. आधुनिक साधने वापरण्याबरोबरच ऊस आणि भुईमुगासाठी आधुनिक खतांचा वापर करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात येऊन तशी खते शेतकी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात आली.
चांगले आणि दर्जेदार बियाणे पुरवठा ही संस्थेने केला. त्यासाठी देशभरातून चांगल्या प्रतीचे बियाणे आणून ते शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतीसंबंधी आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना व्हावं. केवळ पारंपारिक पद्धतीने शेती न करता उत्पन्न वाढीसाठी शेतीमध्ये नवीन तंत्रांचा वापर व्हावा, आधुनिक साधने वापरावीत, बी-बियाणे आणि खतांमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी संस्थेमार्फत शेतकी प्रदर्शनही भरवण्यात येऊ लागले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी पद्धतीने शेतकी व सहकारी पतपेढ्या या शेतकी संघामार्फत सुरू करण्यात आल्याचे अहवालातून दिसते. मॉडेल शेतीचा प्रयोग राजर्षी शाहू महाराजांच्या आश्रयाखाली या संस्थेने केवळ उपाययोजना सुचवले नाही तर, कोल्हापुरास एक मॉडेल शेतच तयार करण्याचा संकल्प केला व त्यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक पद्धतीने शेतीचे प्रयोग करून ते शेतक्रयांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरले. त्यासाठी पहिल्या काही वर्षांत कोल्हापूरच शेत जमीन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे या अहवालात म्हटले आह