शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ उत्तूर विभागात संभाजीराजेंचा झंझावाती संपर्क दौरा
आजरा : प्रतिनिधी
न्याय मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या शेतकर्यांवर अश्रूधूर, लाठीमार व प्लास्टिकच्या गोळ्यांचा वापर करून गोळीबार करणार्या आणि मणिपूरसारख्या मानवतेला लाजवणार्या प्रकाराबद्दल तोंडावर बोट ठेवणार्या भाजप सरकारने शेतकरी व महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. घटनेची मोडतोड करू पाहणार्या भाजप सरकारला रोखण्यासाठी शाहू छत्रपती यांना येत्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देऊया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ उत्तूर जिल्हा परिषदे मतदारसंघातील संपर्क दौर्याप्रसंगी उमेश आपटे बोलत होते. या संपर्क दौर्यात बहिरेवाडी, मुमेवाडी, धामणे, झुलपेवाडी, बेलेवाडी हुबळगी, चिमणे, महागोंडवाडी, महागोंड, वझरे, होन्याळी, आर्दाळ, मासेवाडी, जाधेवाडी, भादवणवाडी, भादवण, मडिलगे, हालेवाडी आदी गावामध्ये संभाजीराजे छत्रपती यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
उमेश आपटे पुढे म्हणाले, सर्व पातळीवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने सत्ता बळकावण्यासाठी पक्षापक्षात मोडतोडीचे आणि जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे राजकारण अवलंबून एक चुकीचा नवा पायंडा देशात सुरू केला आहे. सत्तेला हापापलेली ही मंडळी असून हे भाजप सरकार नसून जुमला सरकार आहे. देशवासीयांची दिशाभूल करून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला वेळीच रोखले नाही तर त्याचे दूरगामी परिणाम देशाला भोगावे लागतील.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, कोल्हापूरच्या मातीशी नाळ जुळलेल्या छत्रपती घराण्याच्या वारसांचा प्रश्न उपस्थित करून गेल्या पाच वर्षात विकासकामांपासून दूर असलेल्या खासदारांनी मुख्य मुद्यांना बगल देऊ नये. त्यापेक्षा केलेल्या विकास कामाबद्दल जरूर बोलावे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील म्हणाले, निष्ठा हा प्रकार बाजूला ठेवून सोयीचे राजकारण व पक्षाशी गद्दारी करणार्यांना या निवडणुकीतून हद्दपार करा.
या दौर्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील, आजर्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, ओंकार माद्याळकर, वंचित बहुजन आघाडीचे संतोष मासाळे, विलास पाटील यांच्यासह उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांना विसर पडला आहे...
गत निवडणुकीत ज्यांच्या जीवावर ते खासदार झाले त्या सर्वांचा सोयीस्कररित्या या निवडणुकीत विसर पडणार्या खासदारांना या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने उलटसुलट विधाने, टीका करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांना आता पराभवापासून कोणी रोखू शकत नाही असा टोला उमेश आपटे यांनी लगावला.