आमचं ठरलं म्हणूनच खासदार झालात; पण गेल्या पाच वर्षात काय दिवे लावले?
शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ मुरगूडच्या सभेत आ. सतेज पाटील यांचा मंडलिकांना खडा सवाल
मूरगूड : प्रतिनिधी
2019 च्या निवडणुकीत कोणाला तरी हिसका दाखवायचा होता. म्हणून केवळ आमचं ठरलंय...! या दोन शब्दावर तुम्हाला खासदार केले. पण तुम्ही चुकीच्या वाटा धरल्या. वय, अनुभव आणि सन्मान तुम्ही विसरला. गेल्या पाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना केला. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया व महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मुरगूड (ता. कागल) जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गणपतराव मांगोरे होते.
आ. सतेज पाटील यांनी मंडलिक यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना पुढे म्हणाले, तुम्ही चुकीच्या वाटेवर चालत असताना आम्ही तुम्हाला पुन्हा सहकार्य करावं अशी अपेक्षा कशी काय करता? आता तर जनतेचे ठरलंय. पाच लाखांच्या उच्चांकी मताधिक्याने शिव-शाहू आणि डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार आहे. सतेज पाटलांनी जिह्यात जीवाभावाची माणसं मिळवली असून तीच माझी पुंजी आहे. जनतेची सेवा करण्यासाठी सकाळी आठपासून आमच्या घराचं दार सताड उघड असते. आम्ही आलेल्या प्रत्येकाला भेटतो, त्यांची काम करतो, असेही पाटील म्हणाले.
युवा नेते रोहित पाटील म्हणाले, कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राजर्षी शाहूराजांनी कृषी, औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. गोरगरीब शेतकर्यांच्या कल्याणासाठी त्यांनी योजना राबवल्या आहेत. त्याच्या उपकारातून उतराई होण्याची संधी कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारली आहे. म्हणूनच राजर्षींचा वारसा जोपासणारे त्यांचे वारसदार शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित झाला आहे. जे आपल्या पक्षाशी, पक्ष प्रमुखाशी एकनिष्ठ राहिले नाहीत, त्यांना नाकारण्याचा निर्धार लोकांनी केला आहे.
यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, सत्ता ही लोककल्याणासाठी असली पाहिजे. ही निवडणूक देशाची आहे. कोणीतरी काहीतरी सांगतो म्हणून कुणालाही सत्ता देऊ नका. खरं सोनं खोटं सोनं ओळखा. शक्तीपीठ महामार्ग शेतकर्यांना उद्धवस्त करणारा महामार्ग आहे. या मार्गाला आमचा कायम विरोध असेल.
गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे, संजय पवार, शिवाजीराव कांबळे, दिगंबर पाटील, धनाजी सेनापतीकर, प्रा. एकनाथराव देशमुख, साताप्पा कांबळे , शिवानंद माळी यांचीही भाषणे झाली. यावेळी दिनकराव जाधव, शिवानंद माळी, प्रकाश पाटील, दयानंद पाटील, धनाजी गोधडे, शिवाजी मगदूम, एकनाथ देशमुख, धनाजी सेनापतीकर, गजानन साळोखे, शशिकांत गोधडे, सुरेश गोधडे, विजय गोधडे, के. के. पाटील. ए. वाय. पाटील, जयसिंग टिकले, रणजित मुडुकशिवाले, विकास पाटील, रवींद्र कांबळे, बाबुराव शेवाळे आदी उपस्थित होते.